अकोला : (Nana patole On chhtrapati Shivaji Maharaj) महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य करायची मालिका काही संपायचे नाव घेताना दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे कुणबी समाजाचे होते, त्यांनी नेतृत्व व राज्य कसे असावे, याची दिशा राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला दिली. महाराजांच्या पावलावर पाऊल ठेऊन आपण कार्य करीत आहोत, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाद उफाळण्याची दाट शक्यता आहे.
पुढे बोलताना पटोले म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रत्येक समाजाला आपले नेतृत्व मोठे व्हावे, असे अपेक्षित असते. समाजाचे नेतृत्व राहावे, ही काळाची गरज आहे. कुणबी हा अन्नदाता समाज आहे. देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहे. आत्महत्या करू नका, ज्या व्यवस्थेकडून आत्महत्या करायला बाध्य केले जात आहे, त्यांना आत्महत्या करायला लावा, असे आवाहन पटोले यांनी केले. ते अकोल्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यावरही पटोले यांनी टीका केली. मोदींच्या दौऱ्यामुळे राज्याला कुठलाच फायदा झाला नाही, उलट निराशा झाली. जनतेला वेठीस धरण्यात आले. समृद्धी महामार्गामुळे फक्त काही नेते व अधिकाऱ्यांचीच समृद्धी झाली. लवकरच त्याचे पुरावे बाहेर काढू, असा इशारा पटोले यांनी दिला. त्यामुळे येत्या काळात पटोले काय पुरावे बाहेर काढताता हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.