मुंबई : (Nana Patole On Eknath Shinde) शुक्रवार दि. 23 रोजी दादर येथिल शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाला जोराचा धक्का देत मुंबई उच्च न्यायालायाने शिवसेनेला परवानगी दिली. शिवाय न्यायालयाने परवानगी नाकारणाऱ्या महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत, चांगलेच कान उघडले आहेत. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर निशाणा साधला आहे.
नाना पटोले म्हणाले, “राज्यातील सरकार हे स्वत:च कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत आहे. विजयादशमीच्या दिवशी शिवाजीपार्कवर शिवसेनेचा दरवर्षी मेळावा होतो, जो बाळासाहेब ठाकरेंपासून होतोय. काँग्रेसच्या राजवटीत बाळासाहेब ठाकरे काँग्रेसवर टीका करायचे परंतु तरी जी परंपरा त्यांनी ठरवली, त्या परंपरेला काँग्रेस पाठिंबा दर्शवायचा. सध्या जे नवीन हिंदुहृदयमसम्राट झालेले आहेत तेच, हिंदूंच्या व्यवस्थेला विरोधत करताना आपण पाहत आहोत.
पुढे बोलताना पटोले म्हणाले ”याचबरोबर राज्यात कायदा, सुव्यवस्थेबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही पाहीलं असेल की या गटाचा एक आमदार गणेशोत्सवात मुंबईत स्वत: बंदुक चालवत होता. त्यामुळे कायदा, सुव्यवस्था बिघडवण्याचा सरकारकडूनच प्रयत्न सुरू असेल, तर ही सगळ्यात मोठी घातक व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. म्हणून अशा परिस्थिती काल जो न्यायालयाने निकाल दिला त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो.” असं देखील पटोले यांनी यावेळी बोलून दाखवलं.