मुंबई | Nana Patole On Shinde Government – सध्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार स्थापन झाल्यापासून या सरकारवर विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येत आहे. तसंच एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील बंडखोरी केलेल्या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडींवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिदे सरकारवर निशाणा साधला आहे.
नाना पटोले यांनी प्रभादेवीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या प्रकारावरून टीका केली आहे. प्रभादेवीत एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये विसर्जनाच्या दिवशी राडा झाला होता. तेव्हा पोलिसांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटलं होतं. मात्र, दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा दोन्ही गटांमध्ये वाद झाला असून यात सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी केला आहे.
या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले, “महाराष्ट्रात तमाशा करण्याचं काम सुरू आहे. गुवाहाटी आणि त्यानंतरच्या प्रकारामुळे महाराष्ट्राची राजकीय बदनामी देशात झाली. दिवसाढवळ्या गोळीबार, मुलींचे अपहरण या गोष्टी महाराष्ट्रात होत आहेत. अजूनही पालकमंत्र्यांची नियुक्ती नाही. राज्यात निर्माण झालेला हा गोंधळ लोकशाहीला घातक आहे”.