“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंचं वक्तव्य चर्चेत

मुंबई | Nana Patole – सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचं वक्तव्य चर्चेत आहे. नागपूरचा गणवेश घातला की थेट संयुक्त सचिव होता येतं असं विधान नाना पटोले यांनी केलं आहे. तसंच देशात सध्या लोकशाहीचे चारही स्तंभ संपवण्याचं काम सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. बुलढाण्यातील भीमशक्ती कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोलेंनी ही टीका केली आहे.

“सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माध्यमांसमोर येऊन आम्हाला वाचवा असं सांगतात. आता न्यायव्यवस्थाही धोक्यात आली आहे. प्रशासकीय सेवेत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, वन अधिकारी व्हायचं असेल तर तुम्हाला युपीएससीची परीक्षा उर्त्तीण करावी लागते. आता तर युपीएससीची परीक्षा नाही, नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट संयुक्त सचिव पदावर जातो असं चित्र आपण पाहत आहोत”, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

दरम्यान, नाना पटोलेंच्या या टीकेवर आता भाजप नेते राम कदम (Ram Kadam) यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. “जेव्हापासून सरकार गेलं आहे तेव्हापासून फक्त काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नव्हे, तर तिन्ही पक्षाच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. आपण काय बोलत आहोत याचंही त्यांना भान राहिलेलं नाही. वसुली कार्यक्रम, बदल्यांचे पैसे, कमिशन मिळणं बंद झालं आहे, त्यात माध्यमंही त्यांना विचारत नाहीत. त्यामुळे माध्यमांमध्ये कशाप्रकारे यायला मिळेल यासाठी अशी विधानं करतात”, असा खोचक टोला राम कदम यांनी लगावला आहे.

“हाफ पँटचं इतकं कौतुक असेल तर एकदा संघाच्या शाखेत यावं, म्हणजे त्यांना देशप्रेम, समर्पित भाव आणि प्रसिद्धीपासून दूर राहून कसं झिजायचं असतं हे कळेल. आयुष्यात वसुलीच्या पुढे कार्यक्रम केला नाही, हिंदूंचा व्देष केला, भारताच्या आधी आपला पक्ष अशी भूमिका असणाऱ्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडून फार अपेक्षा नाहीत”, अशी टीकाही राम कदम यांनी केली.

Sumitra nalawade: