भंडारा | Nana Patole – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Padvidhar Election) जो डाव फडणवीस आणि भाजपनं खेळला होता, तो आता जनतेला कळला आहे त्यामुळे दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्या भाजपला जनता त्यांची जागा दाखवेल, असा सूचक इशारा नाना पटोलेंनी दिला आहे.
काँग्रेसनं (Congress) उमेदवार म्हणून ज्येष्ठ नेते डाॅ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र, सुधीर तांबेंनी माघार घेत आपला मुलगा सत्यजीत तांबेंचा (Satyajeet Tambe) अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज झाल्यानं अखेर दिल्ली हायकमांडकडे तक्रार करून तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर आज माघारीचा दिवस असून नाना पटोलेंनी तीन वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल, असं म्हटलं आहे. ते भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते.
नाना पटोले म्हणाले की, जो डाव फडणवीस आणि भाजपने खेळला होता, तो आता जनतेला कळला आहे. विशेष करुन पदवीधर आणि शिक्षक मतदारांना समजून आलं आहे. दुसऱ्यांची घरे फोडणाऱ्या भाजपला जनता त्यांची जागा दाखवेल.
तसंच राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या लढाईतील कुठलीही जागा अदलीबदली होणार नाही. सर्व जागा महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढवणार आहोत. शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या सर्वच जागांवर आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला आहे. कोणत्याही जागेची अदलाबदल केली जाणार नाही, सर्वच जागांवर महाविकास आघाडी लढणार असल्याचंही पटोलेंनी सांगितलं.