Nandurbar : (Nandurbar Police Distrributed New Blankets to beggers On The New Years Eve) नवीन वर्षी प्रत्येकजण नवीन संकल्प करतात आणि वर्षभर ते संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतात. अशातच नंदुरबार पोलिसांनी नवीन वर्षाची सुरुवात एका अनोख्या संकल्पाने केली आहे. निराधारांना माणुसकीचा आधार देऊन पोलिसांनी वर्षाच्या पहिल्या अनेकांची मने जिंकली आहेत. (Nandurbar Police)
३१ डिसेंबरच्या रात्री लोक मोठ्या प्रमाणात पार्टी करतात. मद्यपान करून वाहन चालवतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी इतर पोलिसांप्रमाणेच नंदुरबार पोलिसांनी देखील रात्रभर बंदोबस्त लावला होता. दरम्यान, मध्यरात्री अनेक ठिकाणी या पोलिसांना उघड्यावर झोपलेले निराधार लोक दिसले. नंदुरबारमध्ये थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज रात्री उघड्यावर झोपणाऱ्या असंख्य निराधार लोकांची काय अवस्था होत असेल हा विचार पोलिसांच्या मनात आला. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे आज १ जानेवारीला त्या निराधार लोकांना ब्लॅंकेट वाटप करण्याचे ठरवले.
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील व अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी यावर लगेच निर्णय घेत सहकाऱ्यांशी सल्लामसलत करून काही सामाजिक संस्थांच्या मदतीने ब्लॅंकेट उपलब्ध केल्या. जिल्हाभरात शेकडो गरीब व निराधारांच्या अंगावर पोलीस अधिकारी व अंमलदारांनी त्या स्वतःच्या हातांनी पांघरल्या.अशा अनोख्या पद्धतीने नंदुरबार पोलीसांनी नविन वर्षाचे स्वागत केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. दरवर्षी हिवाळयात थंडीने मृत्यू पावणारांची संख्या मोठी आहे.अशावेळी पोलीसांना दुःखी मनाने मृतदेहाचे पंचनामे करावे लागतात त्यापेक्षा गरुजूंना पांघरुन देऊन हे पुण्याचे काम करताना आनंद व समाधान वाटल्याचे नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस अंमलदारांनी सांगितले.