“…शेवटी तुम्हालाही मुंबईत राहायचं आहे”, सरवणकरांच्या भेटीनंतर राणेंचा ठाकरेंना इशारा

मुंबई | Narayan Rane On Shivsena – प्रभादेवीमध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान शिंदे गट आणि शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्ही बाजूंनी बाचाबाची झाली. त्यात सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी ‘म्याँव म्याँव’ म्हणत शिवसेनेवर टीका करणारं भाषण केल्यानंतर वातावरण अधिकच तापलं होतं. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी रात्री पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला. या दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून या वादात आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी केला आहे. याच दरम्यान आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर आमची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागे राहील. अशा प्रकारचे हल्ले करू नका. शेवटी तुम्हाला मुंबई आणि महाराष्ट्रातच राहायचं आहे, असा इशाराही राणे यांनी ठाकरे गटाला दिला. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

“सदा सरवणकर माझे मित्र आहेत. दादरला घटना घडली म्हणून मी त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो. शनिवारी घडलेल्या प्रकारणानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. पोलीस चौकशी करतील. गोळीबार झाला असेल तर आवाज तरी येतोच. तसंही आता शिवसेनेकडं तक्रार करण्याशिवाय काही उरलं नाही. मातोश्रीच्या दुकानात बसून तक्रारीचे मार्केटिंग केलं जात आहे. अशा प्रकारचे हल्ले करू नका. शेवटी तुम्हाला मुंबई आणि महाराष्ट्रातच राहायचं आहे”, असा इशारा नारायण राणेंनी ठाकरे गटाला दिला आहे.

पुढे नारायण राणे म्हणाले, “सदा सरवणकर यांनी गोळीबार केला नाही. त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी 50 लोक घरापर्यंत आले. मुंबईत शिंदे गटाची ताकद आहे की नाही हे आगामी काळात समजेल. मात्र शिंदे गटाची ताकद आम्हाला समजली आहे. सध्या जो गोंधळ उडाला, त्याची आम्ही दखल घेत नाही. जेव्हा दखल घेऊ तेव्हा त्यांना चालणे, बोलणे, फिरणे अवघड होईल. मुंबईतील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचं आम्ही काम करू.”

Sumitra nalawade: