“ठाकरे गटातील चारजण आमच्या संपर्कात…”, नारायण राणेंचा खळबळजनक दावा

मुंबई | Narayan Rane – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांचे राजकारण आता केवळ मातोश्री पुरते मर्यादित राहिले आहे. शिवसेना आता राहिलेली नाही. त्यांच्याकडे केवळ सहा ते सात आमदार असून, त्यापैकी चार जण आमच्या संपर्कात आहेत आणि ते कधीही आमच्याकडे येतील, असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या वतीनं देशात काही तरुणांना नोकरीची नियुक्ती पत्रे देण्यात आली. पुण्यातही ‘यशदा’ येथे राणे यांच्या हस्ते तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

सध्या महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणातील स्तर खालावत चालला आहे. यासंदर्भात नारायण राणे म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणातील स्तर खालावलेला नाही. विरोधकांच्या वैचारिक पातळी तपासण्याची गरज आहे. मला राजकारणातील स्तर घसरू नये असं वाटतं. शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागे राज्य सरकारचा अप्रत्यक्ष हात असल्याचा आरोप केला होता. याबाबत पुण्यातील लोकांना जास्त माहिती आहे. मला कोकणात राहून काही माहिती नाही. परंतु जाधव यांनी भाषणामध्ये केलेली टिंगल, मस्करी हा काय चांगला गुण नाही.”

राज्य सरकारकडून रेशन दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना देण्यात येत असलेल्या दिवाळीच्या किटवरती सत्ताधारी राजकीय नेत्यांचे फोटो आहेत. याबाबत राणे म्हणाले, “फोटो दिला तर बिघडलं कोठे ? त्याच्यावर कागद टाका आणि पाकीट फोडा. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्हीही फोटो लावून नागरिकांना कीट द्या. परंतु संकुचित वृत्ती ठेवू नका.”

Sumitra nalawade: