मुंबई | Narayan Rane On Sanjay Raut – केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात सध्या चांगलाच वाद सुरू झाला आहे. नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “राज्यसभेत संजय राऊत माझ्याशेजारी येऊन मला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल सांगायचे. ते ऐकलं तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) राऊतांना चपलीनं मारतील”, असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केला आहे. ते आज (7 जानेवारी) मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
यावेळी नारायण राणे म्हणाले की, “मी आज एक गोष्ट सर्वांना सांगतो की, मी एक ना एक दिवस उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. कशासाठी माहिती आहे का? कारण मी खासदार झाल्यानंतर राज्यसभेत संजय राऊत माझ्या शेजारी येऊन बसायचे. यावेळी ते मला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे.”
“मला संजय राऊत उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरेंबद्दल जे सांगायचे ते मी आता उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. राऊतांनी सांगितलेली माहिती मी दिल्यावर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी राऊतांना चपलीनं मारलं नाही, तर मला विचारा,” असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले की, “शिवसेना (Shivsena) संजय राऊतांनी वाढवली नाही, तर शिवसेना संपवली आहे. मातोश्रीला सुरूंग लावणारा हा व्यक्ती आहे. ज्याच्या खांद्यावर ते हात टाकतात, तो खांदा गळलाच म्हणून समजा.असा हा विषारी प्राणी आहे. त्यामुळे पुन्हा मला संजय राऊतांबद्दल विचारू नका,” अशी टीकाही राणेंनी केली.