मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरु असताना आता आणखीन नवीन महाराष्ट्र-गुजरात सीमावाद रंगण्याचे चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे आता नवीनच मुद्दा पुढे आला आहे. कारण नाशिककरांनी गुजरातमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील सुरगणा तालुक्यामधील काही आदिवासी पाडे आणि गावातील नागरीकांनी तहसीलदारांना याबाबचे निवेदन दिले आहे. सुरगणा तालुक्यातील नेमकी गावं कोणती, याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या दुर्गम भागातील नागरिकांना स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही वीज, पाणी आणि शिक्षण मिळत नाहीये. सरकारं बदलतात परंतु या भागातील लोकांचे मुलभूत प्रश्न सुटत नसल्याची येथिल नागरीकांनी खंत व्यक्त केली आहे.
या भागात अनेक जिवनाश्यक सोई मिळत नाहीत. विशेषतः या आदिवासी दुर्गम भागामध्ये महिलांना रात्री-अपरात्री पाण्यासाठी मैलन्मैल भटकंती करावी लागते. उन्हाळ्यात तर रात्रीच्या वेळी टेंभे घेऊन पाणी आणावे लागते. अडलेल्या महिलांना डोली करुन आरोग्य केंद्रामध्ये न्यावं लागतं. समस्या सुटत नसल्याने आणि आपल्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांनी गावचा समावेश गुजरातमध्ये करावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे सरकार आता तरी जागे होणार का? आणि नागरीकांच्या समस्या सोडवणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.