मायक्रो फॉर्मिंग क्षेत्रातील संशोधन
पुणे MITWPU: भारतातील सर्वात मोठ्या मशीन टूल प्रदर्शनात एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संशोधक प्राध्यापक संघाने राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड आणि कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन इंडिया तर्फे आयोजित इमटेक्स फॉर्मिंग २०२२ आणि टूलटेक २०२२ ही प्रदर्शनी नुकतीच बंगळुरू येथे संपन्न झाली. यामध्ये एमआयटी डब्ल्यूपीयूचे संशोधक प्राध्यापक टीममधील यंत्र अभियांत्रिकी संकुल प्रमुख प्रा.डॉ. गणेश काकांडीकर यांच्या नेतृत्वाखालील सहायक प्रा. डॉ. अनिल माशाळकर आणि सहायक प्रा. ओंकार कुलकर्णी यांच्या संघाने मायक्रो फॉर्मिंग या क्षेत्रातील संशोधनासाठी हा गौरव प्राप्त केला आहे. यावेळी इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष रवि राघवन आणि उपाध्यक्ष राजेंद्र राजमाने यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन संघाचा गौरव केला.
एरोस्पेस क्षेत्रासाठी वापरातील टायटॅनियम या धातूच्या शंभर मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पत्र्याच्या फॉर्मबिलिटी अनॉलिसिस करण्यात आला. विद्यापीठातील एरोस्पेस रिसर्च अँड डेव्हलपमेंट बोर्ड डीआरडीओ प्रायोजित मायक्रोफॉर्मिंग रिसर्च सेंटर येथे हे संशोधन करण्यात आले आहे. या यशासाठी संघाचे सर्व स्तरामधून अभिनंदन होत आहे.