मुंबई : खासदार नवनीत राणा यांनी सांताक्रूझ येथील लॉकअपमध्ये पोलिसांनी पाणी दिले नाही, शौचालयास देखील जाऊ दिले नाही असा आरोप केला आहे. मात्र आता मुंबई पोलिसांनी नवनीत राणांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. नवनीत राणा यांना लॉकअपमध्ये असताना बिसलेरीचं पाणी देण्यात आलं, तसेच त्यांना अधिकाऱ्यांसाठी असलेल्या बाथरुमचा वापर करु दिला असा अहवाल मुंबई पोलिसांनी राज्य सरकारला दिला आहे. या संबंधित छायाचित्रंही या अहवालासोबत दिली असल्याची माहिती आहे.
यावेळी मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, खासदार नवनीत राणाशी संबंधित एक अहवाल मुंबई पोलिसांनी राज्य सरकारला पाठवला आहे. लॉकअपमध्ये असताना नवनीत राणा यांना प्यायला पाणी दिलं होते. त्या वेळचे फोटोग्राफ्स देखील काढण्यात आले आहेत. इतकेच नाही तर लॉकअपच्या आवारात असलेल्या एका अधिकाऱ्याच्या केबिनमधील वॉशरुम देखील नवनीत राणा यांना वापरण्यासाठी दिले होते. हे सगळं कॅमेऱ्यात कैद झालं असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
तसंच नवनीत राणा यांना लॉकअप मधील पाणी दिले, पण ते घेण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांना पोलिसांनी बिसलेरी पाण्याची बॉटल दिल्याचं, तसंच चहा देखील दिल्याचं सूत्रांकडून समजलं आहे. सोबतच नवनीत राणा यांचे आरोप खोडून काढण्याइतपत पुरावे पोलिसांकडे आहेत असंही सांगितलं जातं आहे.