मुंबई : खासदार नवनीत राणा यांच्या लीलावती रुग्णालयात एमआरआयसह विविध तपासण्या होत असतानाचा तिथला व्हिडीओ समोर आल्यानंतर शिवसेनेनं रुग्णालय प्रशासनास चांगलचं धारेवर धरलं आहे. नवनीत राणा यांचा सीटी स्कॅन करतानाचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे तिथे फोटो कसा काढण्यात आला, याविषयी रुग्णालयानं स्पष्टीकरण देण्याची मागणी करत राणांवर झालेल्या उपचारांविषयी शंका उपस्थित करण्यात आली आहे. नवनीत राणांच्या उपचारांबाबत जाब विचारण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत, तसंच नवनीत राणांचा रिपोर्ट मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसेनेकडून घेण्यात आला आहे. यासंदर्भात दिल्लीत पोहोचलेल्या नवनीत राणा यांनी भाष्य केलं आहे.
नवनीत राणा टिव्ही९ सोबत बोलताना म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता असल्यानं गैरवापर केला जात आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या घरावर कारवाई करण्यात येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या लीलावतीमधील बाकीच्या रुग्णांच्या घराचीही मोजमापणी करु शकतात. लीलावती रुग्णालय तोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले तर नवल वाटणार नाही. कारण त्यांचं सूडबुद्धीचे राजकारण रुग्णालापर्यंत पोहोचलं आहे.”
“मी लीलावतीमध्ये एमआरआय केला आहे. दोन वर्षे मुख्यमंत्री कार्यालयात गेले नाहीत म्हणून आम्ही कधी उद्धव ठाकरेंचा रिपोर्ट मागितला का? आधी त्यांनी त्यांचे रिपोर्ट द्यावे मग मला रिपोर्ट मागावा. मी सर्व रिपोर्ट पुराव्यसह देईन. कोणाचे खासगी रिपोर्ट मागणे सरकारचे काम नाही,” असं नवनीत राणा म्हणाल्या.