महाराष्ट्रातील नवरात्र परंपरा

भारतीय संस्कृतीचा उत्सव

महाराष्ट्रात कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानीमाता, माहूरची रेणुकामाता, ही तीन पूर्ण पीठे, तर वणीचे श्री सप्तशृंगी हे अर्धे पीठ म्हणून यांचा नवरात्रोत्सव साजरा होतो. पोटासाठी भटकणाऱ्या आहेत, त्यांच्या दृष्टीने रोजचे काम हीच पूजा असते, अशा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे.

महाराष्ट्रात श्रावण महिन्यापासून सणावारांना सुरुवात होते. वर्षभर सण व उत्सव चालू असतात. त्यामुळे एक परंपरा व एकात्मतेची भावना वाढीस लावणारा हा संकल्पच असतो. नवरात्र हा नऊ दिवस चालणारा देवीचा उत्सव आहे. हे सारे सण नागर अर्थात कृषिसंस्कृतीतून निर्माण झाले आहेत. या सणांचा हेतू हा बळीराजाला बलस्थाने प्राप्त करून देणारा आहे. सर्व सणात पशु व शेतीला महत्त्व आहे. नवरात्र उत्सव हा छत्रपती शिवरायांच्या काळापासून सबंध महाराष्ट्रात घरोघरी व गडकोट किल्ल्यांवर थाटामाटात साजरा केला जात असे. ब्रिटिश राजवटीत पारतंत्र्यामुळे काही परंपरा मागे पडल्या. सध्या तर उत्सव हे पार्टीसारखे केले जातात.

त्यास वेगळे रूप येऊ न देता महाराष्ट्राची नवरात्र उत्सवाची परंपरा धार्मिक अधिष्ठान जपणारी आहे. ते मोठ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. अाश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हे संपूर्ण नवरात्र असते. यास शारदीय नवरात्र असेही म्हणतात. हा उत्सव कुलधर्म असल्याने कटाक्षाने पाळला जातो. आपल्या कुळावर व घरावर देवीची कृपादृष्टी व्हावी, अदृष्ट शक्तीपासून संरक्षण व्हावे, म्हणून हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. हा उत्सव कृषीलोकोत्सव असल्याने मातीला अर्थात शेतीला महत्त्व प्राप्त होते. पहिला दिवस हा घटस्थापना म्हणून असतो. महाराष्ट्रात ही परंपरा असून प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या परंपरा व रुढी आहेत. त्यानुसार नवरात्र साजरा केला जातो. घटस्थापनेला घट हा मातीचाच असावा लागतो. माती ही पवित्र व इतर धातूंपेक्षा श्रेष्ठ आहे. घटस्थापना ही शुभ काळातच केली जाते. यादिवशी शेतातील काळी माती आणून वेदिका तयार करून त्यावर हळदीच्या रंगात सात प्रकारचे वेगवेगळे धान्य मिसळून पेरली जातात.

घटाला नऊ विड्याच्या पानांची माळ घालतात. दररोज वेगवेगळ्या फुलांचे हार अर्पण केले जातात. तो घट नऊ दिवस हलवला जात नाही. दसऱ्याच्या दिवशी हे उगवलेले अंकुर देवी-देवतांना अर्पण केले जातात, तर त्यातील काही अंकुर आपल्या मस्तकी धारण करतात. यातून शेतकरी व त्याचे पिक उत्तम प्रकारे यावे, म्हणून हा कृषी उत्सव आहे. ही महाराष्ट्राची परंपरा कायम आहे. नवरात्रीबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. यात श्रीरामांनी लंका विजयासाठी देवी भगवतीचे नऊ दिवस पूजन करून प्रसन्न करून घेतले व लंका विजयाचा आशीर्वाद प्राप्त केला. दहा दिवस रावणाशी युद्ध होऊन रावणाचा वध करून लंका विजय प्राप्त केला, म्हणून दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते. या दिवशी रावणदहन करण्याची परंपरा पुढे सुरू झाली. तसेच दुर्गेने शक्तिरूप धारण करून महिषासुराबरोबर नऊ दिवस युद्ध केले. त्यात त्याचा दहाव्या दिवशी वध केला. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून ही नवरात्र परंपरा अस्तित्वात आली.

नवरात्रकाळात शिवरायांचे हेरगिरी खाते अधिक प्रभावी काम करीत असे. म्हणून याच परंपरेने छत्रपती शिवरायांना स्वराज्याची प्रेरणा देऊन हिंदवी स्वराज्य मावळ्यांच्या मदतीने उभे केले. प्रत्येक वीस कोसागणिक प्रथा, परंपरा बदलल्या जातात. तशाच महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा उत्सव घटस्थापनेने होतो, तर इतर राज्यांत देवीची मूर्तीची स्थापना होते. महाराष्ट्रात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना नवरात्र उत्सव मुंबईत १९२६ ला घेण्यात आला. यात प्रथम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. त्यानंतर सध्या महाराष्ट्रात गावोगावी देवीची गणेशासारखी स्थापना केली जात आहे. महाराष्ट्रात कोळी, आगरी, मालवणी, तसेच मराठवाडा, प. महाराष्ट्रात थोड्याफार फरकाने सारखाच नवरात्र साजरा होतो. कालानुरूप अनेक नोकरी व्यवसायामुळे व लोकांच्या उदासीनतेमुळे अनेक प्रथा मृतावस्थेला आहेत. यात या काळात भुत्या येणारा आता अदृश्य झाला आहे. भुत्या गळ्यात कवड्याची माळ घालून तुणतुणे वाजवत तेल व धान्य मागत देवीची आरती म्हणत पूर्ण गावभर फिरत असे. नवरात्र हा महिलाप्रिय सण असून महिला या नऊ दिवसांत देवीच्या सेवेत सक्रिय असतात.

हा उत्सव नऊ रंग घेऊन येतो. पांढरा, लाल, गडद निळा, पिवळा, हिरवा, करडा, केशरी, मोरपंखी आणि गुलाबी हे रंग प्रत्येक दिवशी अंगिकारले जातात. त्यास एक महत्त्व असून आपल्या जीवनात नऊ रंगांचा समावेश असावा. त्यामुळे नैराश्य येत नाही, असा संकल्प साजरा केला जातो. देवीला नऊ दिवस वेगवेगळ्या फुलांची माळ घातली जाते. महाराष्ट्रात कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानीमाता, माहूरची रेणुकामाता, ही तीन पूर्ण पीठे, तर वणीचे श्री सप्तशृंगी हे अर्धे पीठ म्हणून यांचा नवरात्र उत्सव साजरा होतो. पोटासाठी भटकणाऱ्या आहेत, त्यांच्या दृष्टीने रोजचे काम हीच पूजा असते अशा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे. यासाठी महिलांनीच पुढाकार घेऊन या समाजाचे आम्हीही काही देणे लागतो, म्हणून उपेक्षित महिलांना वस्त्रदान व त्यांच्या उत्कर्षासाठी कार्य केले पाहिजे. तर भारतीय संस्कृतीचा उत्सव साजरा झाला असे समजावे.

विठ्ठल वळसे-पाटील

Nilam: