दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधी पक्ष एकत्र यावेत, असे प्रयत्न चालू असले तरी काही घटना, घडामोडी अशा घडत आहेत की, देशपातळीवर विरोधकांचे ऐक्य खरोखरच होईल का? अशा शंका निर्माण होत आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते खा. सदार राहुल गांधी यांच्या विधानांवरून मित्र पक्षांकडूनच टीका केली जाते किंवा त्यांच्या धोरणालाच छेद देऊन त्यांच्या प्रचाराला लगाम घातला जातो.
हिंदू महासभेचे संस्थापक आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना राहुल गांधी सातत्याने माफीवीर संबोधतात. राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली तेव्हाही प्रतिक्रिया देताना ‘माफी मागायला मी काही सावरकर नाही’, असे विधान राहुल गांधी यांनी केले. गांधी यांच्या प्रतिक्रियेवरून शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे संतापले आणि त्यांनी सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, अशी तंबी राहुल गांधी यांना दिली. त्यावरुन आघाडी धोक्यात येते की काय? असे वातावरण तयार झाले. विरोधी पक्षांच्या बैठकीत सर्वच पक्षांनी राहुल गांधी यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली.
सावरकर हा विषय मी पुन्हा काढणार नाही, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिल्यावर आघाडीतील वादळ शांत झाले.
त्याच दरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या आर्थिक व्यवहारांवर शंका उपस्थित केल्या. त्यांच्या या पवित्र्याला किंवा प्रचाराला शरद पवार यांनी खोडा घालून राहुल गांधी यांची आणि पर्यायाने काँग्रेसची पंचाईत केली आहे.
उद्योगपतींना लक्ष्य करू नका, असा अनाहूत सल्ला शरद पवार यांनी काँग्रेसला दिलेला आहे. विरोधात असताना टाटा, बिर्ला यांच्यावर मी ही टीका करीत होतो. पण, ती चूक होती ते नंतर माझ्या लक्षात आले, अशा शब्दात पवार यांनी काँग्रेसला समजावले आहे. पवार आणि उद्धव ठाकरे यांचेही अदानींशी मैत्रीचे संबंध आहेत हे इथे लक्षात घेतले पाहिजे. अदानी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना पवारांचे नातू आमदार रोहित यांनी त्यांच्या गाडीचे सारथ्य केले होते आणि त्याचे फोटोही प्रसिद्ध केले होते.
पवार यांच्या विधानावर काँग्रेस आणि विशेषतः राहुल गांधी कोणती प्रतिक्रिया देतात ते पाहावे लागेल. पान ४ वर सावरकर प्रकरणात राहुल गांधी यांनी एक पाऊल मागे घेतले. मात्र, अदानी प्रकरणात ते माघार घेण्याची शक्यता अगदी कमी आहे. मोदी विरोधकांचे ऐक्य होऊ द्यायचे नाही. काहीना काही खुसपट काढत रहायचे, अशी चर्चा सध्या पवारांसंबंधात ऐकू येत आहे.