मुंबई | Neelam Gorhe – विधान परिषद उपसभापती डाॅ.नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) या शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. नीलम गोऱ्हे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शुक्रवारी (18 नोव्हेंबर) रात्री मुंबईतील ट्रायडंट हाॅटेलमध्ये भेट झाली. या भेटीनंतर एकच खळबळ उडाली. यादरम्यान, टीव्ही-9 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गोऱ्हे यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं.
निलम गोऱ्हे यांना मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या भेटीसंदर्भात विचारलं असता त्या म्हणाल्या, “या भेटीचा उलट-सुलट अर्थ काढण्याची गरज नाही. मुळात तुमच्याकडे आलेली माहिती ही वेगळ्या स्वरूपात आलेली दिसते. मी लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला (Om Birla) यांच्या भेटीसाठी गेले होते. सध्या ते मुंबईत आहेत. मी जेव्हा तिथे गेले तेव्हा 10व्या मजल्यावर स्वत: मुख्यमंत्री आणि इतर लोक त्यांच्यापाशीच बसलेले होते”, असं गोऱ्हेंनी सांगितलं.
“मला ओम बिर्लांकडे निवेदन द्यायचं होतं, त्यांना शुभेच्छा द्यायच्या होत्या. तसंच काही विधीमंडळाचे विषय होते त्यासंदर्भात मी ओमप्रकाश बिर्ला यांच्याशी चर्चा केली. त्याठिकाणी एकनाथ शिंदेंचं देखील बोलणं चाललं होतं बिर्लांसोबत. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आले. त्यांनी तिथे पुष्पगुच्छ दिला. अशाप्रकारची ओम बिर्लांसोबत आमची जनरल भेट होती. तिथे एकनाथ शिंदे होते ही वस्तूस्थिती होती. मात्र तिथे कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही आणि मला करायचीही नव्हती”, असंही नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.
पुढे त्या म्हणाल्या, “राजकीय चर्चा म्हटलं तर शिंदे गटात जाण्याचा प्रश्नच येत नाही. माझी तर इच्छा पण नाही हे तुम्हालाही माहितीय. त्यामुळे माझ्याशी चर्चा न करता कारण नसताना अशा बातम्या पसरवून माझं स्वत:चं मनोरंजन झालं. लोकांची सुद्धा खूप करमणूक झाली. तुम्ही माझ्याशी चर्चा केली असती किंवा तिथून निघाल्यानंतर फोन केला असता तर जो गैरसमज पसरला तसं झालं नसतं”, असंही गोऱ्हे म्हणाल्या.
View Comments (0)