ऐकावं ते नवलंच! 63 वर्षाच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला करायचाय सलमान खानसोबत रोमान्स

मुंबई | Neena Gupta – बाॅलिवूडमध्ये काही अशा गोष्टी घडतात की सगळेच आश्चर्यचकीत होत असतात. आता देखील सर्वांना चकीत करणारी गोष्ट सिनेसृष्टीतून समोर आली आहे. आत्तापर्यंत अनेक अभिनेत्रींनी सलमान खानसोबत (Salman Khan) ऑन-स्क्रीन रोमान्स करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसंच आता देखील एका प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीनं सलमानसोबत रोमान्स करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) या आहेत. त्यामुळे सिनेसृष्टीत चर्चांना उधाणा आलं आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता सध्या ‘ऊंचाई’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नीना गुप्ता यांनी सलमान खानशी ऑन-स्क्रीन रोमान्स करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

नीना गुप्ता यांनी ‘गुडबाय’च्या प्रमोशनसाठी ‘बिग बाॅस 16’ च्या सेटवर हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सलमान खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसंच रश्मिका मंदाना आणि नीना गुप्ता यांनी सलमानसोबत खूप धमाल केली होती. दरम्यान, नवभारत टाइम्सशी बोलताना नीना गुप्ता यांना सलमानबरोबर काम करण्याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा नीना गुप्ता यांनी एक जुना किस्सा सांगितला आहे.

यावेळी त्या म्हणाल्या, “मागच्या वेळी मी अनिल शर्माचा चित्रपट केला होता, त्यात मी सलमानच्या आईची खूप छोटी भूमिका साकारली होती. पण मला त्याच्यासोबत आणखी जास्त काम करायचं आहे. मला सलमान आवडतो आणि एक व्यक्ती म्हणून मी त्याला पसंत करते. त्याच्याबद्दल मी जे पाहते, ऐकते ते चांगलं असतं. तो स्वतःचा उदोउदो करत नाही, तो खूप मदत करतो. मला त्याच्याबद्दल या गोष्टी माहीत असण्याचं कारण म्हणजे आम्ही काही वर्षांपूर्वी सांताक्रूझच्या गल्लीत मसाबासाठी ऑफिस भाड्यानं घेतेलं होतं. त्या इमारतीत प्रवेश करताच डाव्या बाजूला लोकांची गर्दी होत होती. तिथे कुणीतरी डॉक्टर यायचे. नंतर मला कळलं की ते सलमान खान करायला लावायचा. तिथे येणाऱ्यांकडून पैसे न घेता मोफत उपचार केले जायचे. ही खूप चांगली गोष्ट आहे. मला त्याच्याबद्दल जास्त माहिती नसतानाही एक माणूस म्हणून मला तो आवडतो.”

सलमानसोबत काम करताना कोणती भूमिका साकारायला आवडेल, असं विचारल्यावर नीना गुप्ता म्हणाल्या, “मला सलमानबरोबर एक रोमँटिक चित्रपट करायचा आहे. त्याच्या आईची भूमिका मला करायची नाही. जेव्हा एखादा 60 वर्षांचा पुरूष 20 वर्षांच्या मुलीशी लग्न करू शकतो, तर माझी आणि सलमानची मैत्री नक्कीच होऊ शकते. आमच्या वयात खूप जास्त फरक नाहीये.”

 

Sumitra nalawade: