निगेटिव्ह ताणामुळे युवकांना असते अपयशाची भीती…

मागील लेखामध्ये आपण मेंदूविकासाचा तिसरा टप्पा कोणत्या वयोगटात असतो हे पाहिलेले आहे. आज आपण एकवीस वषार्र्ंच्या पुढे मेंदू कसा काम करतो? युवकांमध्ये विविध कौशल्यांचा विकास कसा होतो? या वयोगटाला कौशल्याचा काळ का म्हणतात? हे सर्व मेंदूविकासाच्या चौथ्या टप्प्यात पाहूया…

किशोरावस्था संपली की, कुमारावस्था म्हणजेच जबाबदारीची अवस्था सुरू झालेली असते. हा वयोगट म्हणजे मानवी जीवनाला स्थैर्य देणारा वयोगट असतो. प्रत्येकाचे शिक्षण पूर्ण झालेले असते, आता कोणता तरी जॉब, व्यवसाय स्वीकारण्याची मानसिक तयारी झालेली असते. विशिष्ट वयाचा टप्पा पूर्ण झाल्यामुळे जबाबदारीची जाणीव प्रत्येकाला होत असते. त्यामुळे अनेक गोष्टीचा सकारात्मक ताण मेंदूवर आलेला असतो. सकारात्मक ताण ही मेंदूविकासाची एक अवस्था आहे. म्हणजे जेव्हा सकारात्मक ताण येतो तेव्हा मेंदूमधील न्यूरॉन्सच्या जोडण्या अधिक प्रमाणात होतात.

अनेक पॉझिटिव्ह हार्मोन्स स्रवतात. त्यामुळे आत्मविश्वास आणि ऊर्जा अफाट असते. सकारात्मक ताणामुळेच आपल्या किडनीच्या वर असलेल्या एड्रीनल ग्रंथीमधून एंड्रॉफिन हा हार्मोन्स जास्त स्त्रवतो. एंड्रॉफिन या हार्मोन्समध्ये ग्लुकोज जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे कोणतेही काम करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती ही युवकांमध्ये असते. या वयोगटात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, प्रेरणादायी पुस्तके, मित्र, कुटुंबातील प्रोत्साहन देणारे व्यक्ती यांचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम घडत असतो. या वयोगटात मुलांना मदत हवी असते, समजून घेणारे, प्रोत्साहन देणारे अडचण आली तर साथ देणारे मित्र आणि कुटुंबातील व्यक्ती हवे असतात. सुरुवात तर करायची असते, पण अनेक प्रश्न, शंका त्यांच्या मनात असतात.

अशा वेळी निगेटिव्ह ताण युवकांच्या मेंदूवर येऊ शकतो. अपयश येण्याची भीती युवकांना सतावत असते. त्यामुळे येथे युवकासाठी कुटुंबाने समर्थपणे प्रोत्साहन, सहकार्य आणि आत्मविश्वास वाढावा, अशा सूचना अशा तिहेरी भूमिकेत राहिले की, मुलांच्या मेंदूवर पॉझिटिव्ह परिणाम घडतो. या वयोगटात ताण हा नैसर्गिकपणे युवकांना जास्त येत असतो. कुटुंबातील व्यक्तीसुद्धा आता तो मोठा झाला आहे. त्याला सर्व समजते, त्याची जबाबदारी आहे, अशा भूमिकेत असतात. भविष्याची चिंता, अपयशाची भीती अशा विविध परिस्थितीचा ताण युवकांना जास्त येतो. ताण सहन नाही झाला की, युवकवर्ग व्यसनाकडे वळतो. त्यात अजून भर म्हणजे मेंदूतील पियुशी ग्रंथीमधून कार्टेसॉईल हा हार्मोन्स जास्त स्त्रवतो. याचा परिणाम म्हणून युवकांना कंटाळा किंवा आळस जास्त येणे, मनात गोंधळ उडतो.

अशोक सोनवणे, सायकॉलॉजिस्ट लेखक, मेंदूविज्ञान

Nilam: