नवीन आधार कार्ड बनवणे असो, वा जुन्या आधार कार्डमध्ये सुधारणा करणे असो, आता या सर्व गोष्टी कमी वेळेत शक्य होणार आहेत. टपाल विभागातर्फे गृहनिर्माण संस्था, कार्यालये, शाळा, महाविद्यालये इत्यादी ठिकाणी आधार शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
आधार कार्ड हा ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. त्यात सुधारणा करायची असल्यास किंवा नवीन आधार कार्ड बनवायचे असल्यास नागरिकांना बराच वेळ खर्च करून जवळच्या आधार केंद्रात जावे लागते. यामुळे आधार कार्डची कामे वेळेत होत नाहीत. नागरिकांचा वेळ वाचावा आणि आधार कार्डशी संबंधित कामे सुरळीत व्हावीत या हेतूने टपाल विभागाने आधार शिबिरे आयोजित करण्याचे ठरवले आहे.
ज्या परिसरात नागरिकांना आधार शिबीर भरवायचे आहे त्यांना dop.ippb.mhgmail.com या ईमेल आयडीवर अथवा जवळच्या टपाल कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरात ५ वषपिक्षा कमी वयाच्या मुलांसाठी नवीन आधार नोंदणी, आधार अपडेट आणि सुधारणा (पत्ता, ईमेल, मोबाईल नंबर, बायोमेट्रिक इ.), पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र (डिजिटल लाइफ सर्टिफिकेट) तयार करणे या सुविधा दिल्या जातील.