नवी दिल्ली येथे १९, २०, २१ मे रोजी एक जागतिक परिषद आयोजिण्यात आली आहे. जगातील व्यवस्थापनतज्ज्ञ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने उच्च व्यवस्थापनाची दहा कौशल्ये कोणती, ती अधोरेखित केली जाणार आहेत.
‘व्यवस्थापन’ हे एक प्रवाही शास्त्र आहे हे आपण सर्व जण जाणतोच. माझे असे निरीक्षण आहे, कदाचित तुमचेही असेल की, व्यवस्थापन शिकवणारे प्राध्यापक आणि उद्योग-व्यवस्थापनातील व्यवस्थापक हे परस्परांना बहुधा आदराने वागवत नाहीत! खरे तर दोघांनाही मनोमनी पटलेले आहे की, व्यवस्थापन समस्यांना दोन + दोन = चार अशी उत्तरे नसतातच. सतत बदलणारी परिस्थिती व सतत बदलणारे समस्यांचे स्वरूप हे आव्हान सर्वच व्यवस्थापकांना सतत स्वीकारावे लागते. अर्थातच सतत शिकत राहण्याची तयारी हे एकमेव भांडवल असते. २० व्या शतकाने काय शिकवले? खूप काही शिकवण्याचा प्रयत्न केला, पण आपण शिकलो का? हा खरा प्रश्न आहे. स्वतंत्रपणे आपण गेल्या शतकात काय घडले ते पाहू या. विसाव्या शतकात दोन जागतिक महायुद्धे झाली, कोण जिंकले? कोण हरले? हे महत्त्वाचे नाही.
या संघर्षातून काही स्वामित्वाच्या कल्पनेतून खूप मोठे अत्याचार झाले, हे मान्यच केले पाहिजे. १९३० चा मंदीचा काळ हा अभूतपूर्व धक्का होता. मुद्रणस्फिती (Inflation) म्हणजे काय हे जगाने अनुभवले. जागतिक आर्थिक विकासाला प्रचंड खीळ बसली. दोन्ही महायुद्धांवरील प्रतिक्रिया म्हणून यूनो, जागतिक बँक यांची स्थापना झाली व पुनर्बांधणीचे प्रयत्न सुरू झाले. विसाव्या शतकातील पहिली सुमारे ५० वर्षे गेली. भारताच्या दृष्टीने १५ ऑगस्ट १९४७ हा सुवर्णाक्षराने लिहिण्याचा दिवस. सहज सभोवताली बघितले तर औद्योगिक क्षेत्रात काय काय घडले? खरेतर सर्व पुणेकरांच्या समोर हे सर्व घडले. खासगी क्षेत्र, सरकारी क्षेत्र, सहकारी क्षेत्र व संयुक्त क्षेत्र असे विविधांगी प्रयोग सुरू झाले. एका वाक्यात सांगायचे तर पिळवणूक पुढे चालू राहिली. सामान्यतः १९५०-६० या काळात व पुढेही मालकांनी सेवकांची पिळवणूक केली. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून १९६०-७० व पुढेही सेवकांनी (सुसंघटित होऊन) मालकांची पिळवणूक करण्यास सुरुवात केली. ‘हमसे जो टकराएगा – मिट्टीमें मिल जाएगा’ ही गीतमाला चालू झाली. थोडी पडझडही झाली.
हळूहळू मालक व सेवक एकत्र होऊन ग्राहकांची पिळवणूक करू लागले. १९७०-१९८०-१९९० हे चालूच राहिले. उत्पादित वस्तूंची किंमत वाढवणे शक्य होते. सेलर्स मार्केट’ होते त्यामुळे ग्राहकांची पिळवणूक चालूच राहिली – होय राल्फ नाडर यांची ग्राहक चळवळ मूळ धरू लागली. शतकाच्या शेवटी-शेवटी हे चित्र बदलू लागले. (मालक + सेवक + ग्राहक) हे एकत्र येऊन पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून यशस्विता मिळवू लागले. ही एक प्रकारची पिळवणूकच झाली. थोडक्यात म्हणजे विसावे शतक हे पिळवणुकीचे शतक ठरले. २१ व्या शतकाची आव्हाने कोणती? आता आपण २०२२ मध्ये या विषयावर विवेचन करतो आहोत. मिश्र अर्थव्यवस्था आपल्या सर्वांच्या अंगवळणी पडली. व्यावसायिकीकरण (Professionalization) हा महामंत्र ठरला. मध्यंतरी एक महत्त्वाची घटना घडली. ‘जागतिकीकरण,‘ ‘खासगीकरण’ आणि ‘उदारीकरण’ हे दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाले. कोविडची दोन वर्षे सोडली तर तसे बरे चालले होते. ‘जागतिकीकरण’ आमच्या घराजवळ येऊन पोहोचले. संगणकाने अनेक व्यवसायांचे स्वरूप बदलत चालले.
उत्पादन करणार्या कंपन्या व संगणक कंपन्या असे कळत नकळत विभाजन झाले. त्यांच्या पगारातही खूपच तफावत दिसू लागली. सामान्यतः व्यवस्थापकांना असा संदेश देण्यात आला की, यशस्वी होण्यासाठी आपल्या सवयी बदला (सवय म्हणजे HABIT) मानसिकता बदला. सर्वांना माहीत असलेले हे कोष्टक असे आहे. आपण आपल्या घरात डोकावून पाहिले आणि उद्योग संस्थांच्या बदलत्या परिस्थितीचे अवलोकन केले तर हे चित्र स्पष्ट होते. घरातील दादागिरी आता कमी होत चालली आहे का? सुसंवादाकडे वाटचाल सुरू झाल्याचे जाणवते आहे का? प्रचंड अधिकाराच्या दडपणातून स्वायत्ततेकडे वाटचाल. प्रचंड नोकरशाहीच्या जोखडातून प्रमाणीकरणाकडे वाटचाल चालू झाली आहे. संस्थात्मक विकासासाठी व्यक्तिगत विकास’ महत्त्वाचा ठरतो. संस्थेत परिवर्तनामध्ये सहभागी व्हावयाचे असते. आता हळूहळू हे स्पष्ट होऊ लागले आहे की, २१ वे शतक हे निर्माणक्षमतेचे शतक आहे. चपलगती संक्रमण (Agile transformation) हा शब्द आता प्रस्थापित होऊ लागला आहे. सतत बदलणार्या परिस्थितीला तोंड देण्याची चपळता म्हणजेच agility.
ती याप्रमाणे – (१) संशोधनावर आधारलेले वैचारिक अनुबंध (२) सतत शिकत राहण्याचे कौशल्य (३) बिकट प्रश्नांची उकल करण्याचे कौशल्य (४) गंभीर विचार आणि पृथःकरण पद्धती (५) नवीनता, पुढाकार घेण्याची तयारी व मूळ विचार (६) नेतृत्व आणि सामाजिक संवेदना (७) तंत्रज्ञानाचा उपयोग नियंत्रण (८) तांत्रिक आकृतिबंध आणि संपूर्ण योजना (९) लवचिकतेचा विचार (१०) कार्यकारणभाव – समस्या सोडविणे. नावीन्यपूर्ण कल्पना आंतरराष्ट्रीय परिषदेत या सर्व घटकांची परिपूर्ण चर्चा होईल व त्यातूनच मानसिकतेतील बदल नवी व्यूहरचना याविषयी मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट होतील. परिषदेचे उद्घाटन पेट्रोलियम मंत्रालयाचे मंत्री हरदीप सिंग पुरी करणार आहेत. नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात हा कार्यक्रम होणार आहे. जगातून ७५० पेक्षा जास्त प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेचा मुख्य विषय “Strategies for An Agile work culture – Pathways to the New Age” असा नव्या युगाच्या कार्यसंस्कृतीविषयी सांगोपांग विचार या परिषदेत होणार आहे व त्यामुळे हे विचारमंथन वैशिष्ठ्यपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा आहे.
डॉ. श्री. ग. बापट