बंगळुरु : भारताची चांद्रयान ३ मोहीम यशस्वी ठरली आहे. १४ जुलै २०२३ रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोनं चांद्रयान ३ चं प्रक्षेपण केलं होतं. चांद्रयान ३ मधील विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २३ ऑगस्ट रोजी उतरवून इस्त्रोनं जगात इतिहास रचला होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला. चांद्रयान ३ च्या प्रज्ञान रोवरनं कामगिरी फत्ते केल्यानंतर इस्त्रोनं रोवरला २ सप्टेंबर रोजी स्लीप मोडमध्ये पाठवलं होतं. विक्रम लँडरला देखील आज सकाळी ८ वाजता स्लीप मोडमध्ये पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती इस्त्रोकडून देण्यात आली आहे.
विक्रम लँडरनं चंद्रावर उडी मारुन नव्या ठिकाणी प्रस्थान केलं होतं. विक्रम लँडरला स्लीप मोडमध्ये पाठवण्यापूर्वी पेलोडसची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर इस्त्रोकडून स्लीप मोडची कमांड देण्यात आली आहे. सध्या इस्त्रोचे सर्व पेलोडस बंद आहे. फक्त रिसीवर ऑन असल्याची माहिती इस्त्रोकडून देण्यात आली आहे. बंगळुरुहून कमांड देऊन काम पुन्हा सुरु करण्यासाठी रिसीवर ऑन ठेवण्यात आल्याचं इस्त्रोकडून सांगण्यात आलं आहे.
विक्रम लँडरची बॅटरी जशी कमी होईल तसा तो स्लीप मोडमध्ये जाईल. इस्त्रोच्या वैज्ञानिकांना पुन्हा २२ सप्टेंबर २०२३ विक्रम लँडर पुन्हा कार्यरत होईल, अशी आशा आहे. विक्रम लँडरनं ३ सप्टेंबरला चंद्रावर उडी मारली होती. चंद्रावर च्या ठिकाणी सॉफ्ट लँडिंग लँडरनं केलं होतं त्या ठिकाणापासून ३० ते ४० सेमी अंतरावर लँडर पोहोचला. इस्त्रोनं लँडर हवेत ४० सेमी ऊंच उडाल्याची माहिती दिली.विक्रम लँडरची ही उडी भविष्यातील इस्त्रोच्या मोहिमांसाठी फायदेशीर ठरणार आहे.