New Zealandvs Pakistan, Bangladesh T20I Tri-Series 2022 : न्यूझीलंड, पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात ट्राय सिरीज खेळण्यात आली. या सिरीजच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या संघानं न्यूझीलंडचा पाच विकेट्सनं पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरलं. यावेळी बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात बाबरनं 40 चेंडूत 55 धावांची अर्धशतकीय खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
दरम्यान, बाबर आझमनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 11 हजार धावांचा टप्पा गाठलाय. त्यानं 251 डावात हा पराक्रम केला आहे. यासह बाबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11 हजार धावांचा टप्पा गाठणारा आशियाई खेळाडू ठरला आहे. यापूर्वी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला होता. विराटनं 261 डावात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 11 हजार धावा पूर्ण केल्या.
बांग्लादेशविरुद्ध सामन्यात बाबरनं त्याच्या टी-20 कारकिर्दीतील 29 वे शतक झळकावले. तसंच तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजाच्या यादीत टॉपवर पोहचला आहे. या कामगिरीसह त्यानं भारताचा कर्णधार रोहित शर्माला मागे टाकले आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर 28 शतकांची नोंद आहे. त्यामुळे बाबरनं विराट आणि रोहित या दोघांनाही मागं टाकलं आहे.