नवी दिल्ली : गेले पाच ते सहा दिवस झाले संपूर्ण देशभरात अग्निपथ योजनेवरून हिंसाचार पाहायला मिळत आहे. अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाळपोळ, दगडफेक होत असून अनेक तरूण रस्त्यावर उतरले आहेत. या योजनेला देशभरातून विरोध होत असल्यानं आज लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे आता या पत्रकार परिषदेदरम्यान कोणती घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
तसंच सरकारने घेतल्या या अग्निपथ योजनेच्या निर्णयाला बिहार आणि उत्तरप्रदेशमधून जास्त प्रमाणात विरोध केला जात आहे. तर केरळ आणि राजस्थान यासारख्या अनेक राज्यांकडून हा निर्णय मागे घेण्यात यावा यासाठी मागणी देखील गेली जात आहे. १५ जूनला सरकारने ‘मिशन अग्निपथ’ या योजनेची घोषणा केली होती त्यानंतर सैन्यदलाच्या भरतीची तयारी करणाऱ्या अनेक युवकांकडून मोठ्या प्रमाणत विरोध होत आहे. त्यानंतर काल या योजनेबाबत गृहमंत्रालयाकडून काही महत्वाचे निर्णय घेऊन बदल करण्यात आले आहे. तरीदेखील अजूनही युवक रस्त्यावर उतरून मोठया प्रमाणत तोडफोड करत आहेत. यामुळे सरकारचे आर्थिक नुकसान झालं आहे.
दरम्यान, आज दुपारी दोन वाजता हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तिन्ही दलांच्या प्रमुखांकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून आता कोणता निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. तर बिहारमध्ये सर्वात जास्त प्रमाणात हा वाद पेटला असल्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षा दलांच्या जवानांना तैनात करण्यात आलं आहे. तसंच रेल्वेची तोडफोड करणाऱ्या १७० जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेत. तर जवळपास ४६ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर बिहारमधील १२ जिल्ह्यातील इंटरनेट सुविधा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत.