मुंबई | Nilesh Rane – सध्या राज्यात इन्फ्लूएंझा व्हायरसनं (Influenza Virus) अनेक लोक ग्रस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे चिरंजीव आणि भाजप खासदार निलेश राणे (Nilesh Rane) हे देखील इन्फ्लूएंझा व्हायरसच्या विळख्यात अडकले आहेत. त्यांना या व्हायरसची लागण झाली असून याबाबत त्यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “10 तारखेला अचानक ताप भरला आणि हॉस्पिटलमध्ये टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट मध्ये influenza virus डिटेक्ट झाला. हा व्हायरस आणि होणारा त्रास हा फुफ्फुसावर (lungs) हल्ला करतो ज्यामुळे श्वास घेताना अडचण निर्माण होते. ताप येण्याअगोदर कसलेही लक्षण नाही, काही क्षणात ताप भरतो.”
“आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी, खाजगी आयुष्यातलं मी कधीच ट्विट करत नसतो. पण आपल्याला सगळ्यांना अगोदर माहिती असावं म्हणून सांगितलं. नेमकं कशामुळे हे इन्फेक्शन झालं हे अद्याप कळू शकलं नाही”, असंही निलेश राणेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, influenza virus (H3N2) हा व्हायरल फ्लू आहे. हा व्हायरस हवेद्वारे, स्पर्शाद्वारे पसरतो. H3N2 वर सध्या कोणतीही लस उपलब्ध झालेली नाहीये. पण या व्हायरसच्या संक्रमाणातून तुम्हाला वाचायचं असेल तर दररोज हात स्वच्छ धुवा. खोकताना, शिंकताना रूमालाने तोंड झाका, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा किंवा गेल्यास मास्कचा वापर करा, सॅनिटायझर वापरा आणि संक्रमित व्यक्तीपासून दूर राहा. तसंच जर या फ्लूची लक्षणे तुमच्यात आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.