इंदापूरमध्ये राष्ट्रवादीकडून निर्मला सीतारमण यांचे अनोखे ‘निषेधार्थ स्वागत’

इंदापूर – Nirmala Sitaraman On Baramati Visit : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण भाजपाच्या मिशन लोकसभा या कार्यक्रमांतर्गत, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बारामती विजयासाठी भाजपाने आतापासूनच जंगी तयारीला सुरवात केल्याचे दिसून हेत आहे. शुक्रवार ( दि. २३ सप्टेंबर ) रोजी सितारामण या इंदापूर दौऱ्यावर होत्या. त्यावेळी तालुक्यातील निमगाव केतकी गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी निर्मला सितारामण यांच्या स्वागताचा फलक लावल्याने तालुक्यात त्या एकाच फलकाची मोठी चर्चा रंगली आहे.

निर्मला सितारामण या सायंकाळी साडेसहा वाजता निमगाव केतकी येथील श्री संत सावतामाळी मंदिरात उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते आरती सेवा सप्ताह होऊन रक्तदान प्रमाणपत्र वाटप होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी निमगांव केतकीत निर्मला सितारामण यांच्या स्वागताचा लक्ष वेधणारा फलक लावत त्यावरील मजकूरातून केंद्र सरकार व अर्थमंत्री यांना मार्मिक टोले दिले आहेत.

‘फलकात भारत देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी यांचे बारामती लोकसभा मतदार संघातील इंदापूर नगरीमध्ये मनःपूर्वक स्वागत.’ अशा आशयाचे भले मोठे फलक निमगाव केतकी येथे, राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी लावले आहे.

फलकावरील मुद्दे :

  • पेट्रोल-डिझेलने शंभरी पार केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
  • स्वयंपाकाच्या गॅसने हजारी पार केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
  • जनसामान्यांच्या रोजी-रोटीवर जी.एस.टी. लावल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
  • रासायनिक खतांसह कृषी निविष्ठांनी उच्चांक गाठल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
  • १५ लाख रुपये भारतीयांच्या खात्यावर आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
  • वेदांत प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला पोहचविल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
  • सुशिक्षीत बेरोजगार युवकांना नोकऱ्या उपलब्ध केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
  • महाराष्ट्रासह अन्य राज्यांत लोकशाही मार्गाने आलेले सरकार हद्दपार करून हुकुमशाहीची सत्ता आणल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
  • बारामती लोकसभा हे एक विकासाचे रोल मॉडेलला पहिल्या वेळ भेट दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
Dnyaneshwar: