जेजुरी – Nirmala Sitaraman Visits Jejuri : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शुक्रवार दि २३ रोजी महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या गडावर जावून देवाचे दर्शन घेतले. दर्शनानंतर कुलधर्म कुलाचारानुसार तळीभंडाराचा विधी करून देवाचे लेण असणाऱ्या भंडार खोबऱ्याची उधळण केली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचा बारामती लोकसभा मतदार संघात दौरा असून शुक्रवार दि २३ रोजी सकाळी साडे नऊ वाजता त्या जेजुरी गडावर आल्या. जेजुरी गडावरील मुख्य मंदिरात त्यांनी श्री खंडोबा देवाचे दर्शन घेतले. मंदिरासमोरील कासवावर कुलधर्म कुलाचारानुसार त्यांनी तळीभंडाराचा धार्मिक विधी करून भंडार खोबऱ्याची उधळण केली. यावेळी देवाचा जागरण गोंधळ ,तसेच ४२ किलो वजनाच्या तलवारीची प्रात्यक्षिके त्यांच्या समोर सादर करण्यात आली.
श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने प्रमुख विश्वस्त तुषार सहाने,विश्वस्त पंकज निकुडेपाटील,राजकुमार लोढा,अशोक संकपाळ,प्रसाद शिंदे , मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचा खंडोबा देवाची मूर्ती देवून सत्कार केला. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राम शिंदे, राहुल कुल, माजी मंत्री विजय शिवतारे,बाळा भेगडे, जालिंदर कामठे , बाळासाहेब गावडे, गिरीश जगताप, बाबाराजे जाधवराव,सचिन लंबाते, जेजुरी शहर भाजपचे अध्यक्ष सचिन पेशवे, प्रसाद अत्रे, अलका शिंदे,गणेश भोसले, आदी उपस्थित होते.
प्रांत अधिकारी प्रमोद गायकवाड,तहसीलदार रुपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपाधीक्षक राहुल धस, पोलीस निरीक्षक उमेश तावसकर आदी प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.