“भास्कर जाधव तोंड सुटल्यासारखे…”, हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंचं समर्थन करणारं वक्तव्य

मुंबई | Nitesh Rane On Bhaskar Jadhav – उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची शक्यत वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या घराच्या परिसरात दगडं, स्टम्प आणि काचेच्या बाटल्या आढळल्या आहेत. त्यामुळे भास्कर जाधवांच्या घरावर पोलीस बंदोबस्तदेखील वाढवण्यात आला आहे. यासंदर्भात राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यामध्ये आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

भास्कर जाधव यांनी काल (18 ऑक्टोबर) कुडाळमध्ये बोलताना नारायण राणे (Narayan Rane) आणि नितेश राणेंचा उल्लेख बेडूक, कोंबडीचोर, चरसी कार्ट असा केल्यामुळे राणेंचे कार्यकर्ते संतप्त झाल्याची शक्यता नितेश राणेंनी वर्तवली आहे. “भास्कर जाधव तोंड सुटल्यासारखं सगळीकडे बोलत आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांना मानणारा महाराष्ट्रात फार मोठा वर्ग आहे. या नेत्यांवर तुम्ही पातळी सोडून बोलायला लागलात तर त्या त्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा राग अनावर होणारच ना?”, असं नितेश राणे म्हणाले.

पुढे नितेश राणे म्हणाले, “आता तुम्हाला कुणावर राजकीय टीका करायची असेल, तर राजकारणापुरतेच बोला. तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन बोलाल, तर कार्यकर्ते त्यांच्या पद्धतीने प्रतिक्रिया देणारच. कुणाकुणाला थांबवणार तुम्ही? भास्कर जाधवांना जर बोलण्याची एवढी सवय आहे, तर या सगळ्या गोष्टींची सवयही त्यांनी ठेवली पाहिजे. राणेंना मानणारा वर्ग गप्प कसा बसणार? आम्ही तरी कार्यकर्त्यांना किती सांगणार?”

“आम्हाला राज्यातली कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडवायची नाहीये. पण शेवटी कार्यकर्तेही बघत आहेत. राजकारण सोडून जेव्हा नेत्यांवर कुणी खालच्या पातळीवर बोलत असेल तर कार्यकर्त्यांना सांभाळणं आमच्याही हाताबाहेर जाणार. हल्ला कुणी केला हे पोलिसांनीच शोधून काढायला हवं. काल व्यासपीठावरून भास्कर जाधव ज्या पद्धतीनं तोल सोडून बोलले त्यावर त्या पद्धतीने प्रतिक्रिया आल्या असतील. आता पोलिसांनी याचा शोध घ्यायला हवा”, असंही नितेश राणे म्हणाले.

Sumitra nalawade: