“सगळ्यांची सकाळ खराब करणारे…”, संजय राऊतांच्या ईडी चौकशीवर नितेश राणेंचा टोला

मुंबई | Nitesh Rane On Sanjay Raut’s ED Enquiry – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीचं पथक त्यांच्या घरी दाखल झालं आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) पथकानं आज (31 जुलै) सकाळी 7 वाजता संजय राऊत यांच्या मुंबई येथील घरी धाड टाकली. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राऊतांच्या मैत्री बंगल्याबाहेरच ईडीविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. तर दुसरीकडे यावर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये भाजप नेते नितेश राणे यांनी एबीपी माझाशी बोलताना संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे.

यावेळी नितेश राणे म्हणाले, सगळ्यांची सकाळ खराब करणारे संजय राऊत यांची सकाळ खराब झाल्याचं बघून समाधान मिळतंय. पत्राचाळमधील गरीब रहिवाश्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. राऊत स्वत:ला फार मोठे समजायचे. झुकेगा नही म्हणणाऱ्या राऊतांची आता काय अवस्था आहे हे एकदा विचारा. भ्रष्टाचार, महिलांवर अत्याचार केल्यानंतर संजय राऊतांना वाटायचं त्यांना कधीच काहीही होणार नाही. ईडीची चौकशी आणि दुसऱ्यांना त्रास देणे काय आहे हे आता त्यांना कळाले असेल.

पत्राचाळ रहिवाश्यांची संजय राऊत आणि त्या बिल्डरांनी मिळून फसवणूक केली आहे. या फसवणूकीची शिक्षा त्यांना मिळायला हवी. भ्रष्टाचाराची किंमत राऊतांना चूकवावी लागणार. तुम्ही भ्रष्टाचार केला असेल, पैशांची हेराफेरी, गरीब लोकांना फसवलं असेल तर त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारचं. सकाळी सकाळी येऊन राऊत इतरांची सकाळ खराब करायचे तो आव आता आणून दाखवा, अशी टीकाही नितेश राणेंनी केली आहे.

Sumitra nalawade: