नितीन देसाई यांनी अनेक भव्यदिव्य सेट उभे करून आणि स्वप्नातील वाटावा असा स्टुडिओ उभा करून केवळ चित्रपटाची सेवा केली असे नव्हे, तर अनेक इव्हेंटमध्ये वेळोवेळी महाराष्ट्राचे भव्य प्रतिबिंब उभे करण्यासाठी त्यांनी आपले तन-मन-धन अर्पित केले. त्यांचा मृत्यू हा मराठीजनांकरिता धक्कादायक आहेच, परंतु आपण कुठे चुकतो आणि आपल्यातील प्रतिभाक्षम माणसाला आपण कसे उभे केले पाहिजे याचे समाजाला अंतर्मुख होऊन चिंतन करायला लावणारा हा मृत्यू आहे.
व्यदिव्य स्वप्नांना नियतीने साथ दिली नाही की, प्रचंड मोठा भ्रमनिरास होतो. भ्रमनिरास जर एखाद्या असामान्य कर्तृत्व दाखवणाऱ्यांचा असेल तर त्याची मोठी किंमत समाजाला मोजावी लागते. एक प्रेरणास्थान म्हणून उभे असलेल्यांची अखेर हा अनेकांकरिता धक्का असतो. यापूर्वी अशा अनेक नायक म्हणून जगणाऱ्या, परंतु अखेर जीवन संपवणाऱ्या समाजपुरुषांबाबत घडल्याचे आपणास दिसून येते. काही वर्षांपूर्वी इंदूरचे भय्यूजी महाराज यांच्याबाबतदेखील असेच काहीसे घडले होते. मागील महिन्यात ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूची धक्कादायक बातमी समजली. अखेरच्या दिवसांत ते एकटे एका भाड्याच्या घरात राहात होते, हेदेखील वास्तव समोर आले.
आज ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या बातमीने असाच धक्का बसला. प्रचंड मोठी प्रतिभा, भारतीय संस्कृती आणि इतिहास, अनेक परंपरा या जशाच्या तशा चलचित्रांमधून उभे करणारे सेट लावण्याचे सामर्थ्य, कमालीची निरीक्षण शक्ती आणि प्रचंड दुर्दम्य आशावाद असे अनेक गुण ठायी असलेला हा ज्येष्ठ दिग्दर्शक आज अत्यंत टोकाचा निर्णय घेता झाला. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांनी उभ्या केलेल्या एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केल्याची बातमी कळली आणि सिनेमा क्षेत्राचाच नव्हे तर तमाम मराठी माणसांच्या काळजाचा ठोका चुकला. असे काय घडले की, त्या मोठ्या दिग्दर्शकाने आपले जीवनयात्रा संपवावी. त्यानंतर त्यांच्या आर्थिक स्थितीची चर्चा समोर आली.
मराठी उद्योजकाला किंवा काहीतरी भव्यदिव्य करणाऱ्या व्यक्तीला आपण खरोखरच किती मदत करतो आणि त्याच्या संकटकाळामध्ये आपण किती सामर्थ्याने त्याच्या पाठीमागे उभे राहतो, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हेच देसाई, जिथे व्यवसाय आणि व्यावसायिकतेला महत्त्व दिले जाते अशा समाजात जन्माला आले असते तर तेथील राज्यकर्त्यांपासून ते कलारसिकांपर्यंत सर्वांनी देसाईंचे पुनर्वैभव परत मिळवून देण्याकरिता भरभरून दिले असते. आपल्याकडे समाजाला सांभाळण्याची, मराठी बाणा जपण्याची आणि प्रसंगी पुढे होऊन साथ देण्याची वृत्ती मराठी माणसांमध्ये कमी आहे हे नाकारून चालणार नाही. अनेक भव्यदिव्य सेट उभे करून आणि स्वप्नातील वाटावा असा एनडी स्टुडिओ उभा करून त्यांनी केवळ चित्रपटाची सेवा केली असे नव्हे, तर जाणता राजा किंवा मॅग्नेटिक महाराष्ट्र सारख्या अनेक इव्हेंटमध्ये वेळोवेळी महाराष्ट्राचे भव्य प्रतिबिंब उभे करण्यासाठी त्यांनी आपले तन-मन-धन अर्पित केले. मराठी चित्रपटसृष्टीतदेखील अनेक कलाकारांनी त्यांचा वापर अत्यंत नाममात्र शुल्क देऊन करून घेतला, हे वास्तव आहे.
अशा लोकांनी नितीन देसाई यांची प्रतिभा वापरून कोट्यवधी रुपये कमावले, परंतु त्यांच्या वाईट वेळेला ते त्यांच्यापाशी नव्हते, त्यांनी त्यांना साथ दिली नाही, ही मोठी शोकांतिका आहे. एनडी स्टुडिओ उभारत असताना कर्जतच्या त्या माळरानावर देसाई यांनी अल्प बजेट असलेल्या चित्रपटांची सोय व्हावी हेच स्वप्न पाहिले होते. ज्या निर्मात्यांची फारशी क्षमता नाही त्यांना गोरेगाव किंवा फिल्मसिटीसारखे बिग बजेट स्टुडिओ परवडत नाहीत अशांची सोय होण्याकरिता कर्जतमध्ये त्यांनी हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओ उभारला, परंतु असे दिसते की, व्यवहाराच्या जगामध्ये ना आर्थिक संस्थांनी त्यांची भावना जाणून घेतली, ना त्यांचे सहकार्य घेणाऱ्यांनी. ऑलिव्हर स्टोन सोबत फिरताना अलेक्झांडर या चित्रपटाचे शूटिंग भारतात करायचे आणि त्यासाठी यथायोग्य स्टुडिओ नाही ही खंत त्यांच्या मनात राहिली आणि त्यातून त्यांनी या एनडी स्टुडिओची निर्मिती केली. त्यांचा मृत्यू हा मराठीजनांकरिता धक्कादायक आहेच, परंतु आपण कुठे चुकतो आणि आपल्यातील प्रतिभाक्षम माणसाला आपण कसे उभे केले पाहिजे याचे समाजाला अंतर्मुख होऊन चिंतन करायला लावणारा हा मृत्यू आहे.