नागपूर | Nitin Gadkari – लोककल्याणासाठी कायदा तोडावा लागला तरी मंत्री म्हणून तोडला पाहिजे असं महात्मा गांधी यांनी सांगितलं होतं. तसंच लोकांच्या हितासाठी कायदा तोडण्याचा आमचा अधिकार आहे. कारण आम्ही मंत्री आहोत, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नागपुरात आदिवासी संशोधन प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी नितीन गडकरी बोलत होते. जागतिक आरोग्य दिन आणि आदिवासी दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी नितीन गडकरी म्हणाले, “सरकार अधिकाऱ्यांच्या मताने नाही तर आमच्या मताने चालेल. आम्ही जसे म्हणू त्याला अधिकाऱ्यांनी “यस सर” म्हणत अंमलबजावणी केली पाहिजे. 1995 मध्ये राज्यात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना गडचिरोली आणि मेळघाट मध्ये 2 हजार आदिवासी बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची महिती समोर आली होती. त्यावेळी त्या भागात 450 गावांना रस्ते नव्हते आणि रस्ते बांधण्यासाठी वन विभागाचे कायदे अडसर ठरत होते. रस्ते नसल्यानं विकास होत नव्हता. त्यावेळी मी माझ्या पद्धतीने ती समस्या सोडविली होती.”
“गरिबांचे कल्याण करण्यासाठी कोणताच कायदा आडवा येणार नाही. त्यासाठी 10 वेळा कायदा तोडावा लागला तरी चालेल, तो तोडला पहिजे असं महात्मा गांधी यांनी सांगितलं आहे. मंत्री म्हणून कायदा तोडण्याचा आमचा अधिकार आहे, असं देखील गडकरी म्हणाले.