मुंबई: सध्या मशिदीवरील भोंग्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्याला महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. तसा कुणी प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कडक शासन केलं जाईल, अशा शब्दांत अजित पवारांनी इशारा दिला आहे.
अजित पवार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, “आपल्याला सगळ्याच जाती-धर्माच्या धार्मिक स्थळांचा आदर आहे. तिथे गेले तर नतमस्तक होतो. त्यांच्या धर्मात ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या गोष्टी ते करत असतात. ही आपली परंपरा आहे. त्यामुळे सध्या राज्यात हे जे काही सुरू आहे, ते थांबलं पाहिजे. ग्रामीण भागात जागरण गोंधळ, हरीनाम साप्ताह याची मला सर्वात जास्त काळजी आहे. कारण असे कार्यक्रम रात्री उशिरा आयोजित केले जातात. गावातील लोक मजुरी काम करून घरी परतल्यानंतर जेवण वगैरे करून अशा कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. पण भोंग्यांना विरोध केल्यामुळे अशा कार्यक्रमांवर देखील बंधणे येणार आहेत.”
“आम्हाला कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. जर कुणी चुकीचं वागत असेल, तर तो कुठल्या पक्षाचा आहे, कुणाचा समर्थक आहे, हे आम्ही बघणार नाही. तो जर कायदा मोडत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. कुणी कितीही अल्टीमेटम दिली तरी आम्ही ऐकून घेणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील ही बाब लक्षात घ्यायला हवी. बोलणारे नेते घरी बसतात पण धरपकड अशा कार्यकर्त्यांची होते. नियम आणि अटींचं पालन करत जे लाऊडस्पिकरसाठी परवानगी घेतील, ते लाऊडस्पिकर लावू शकतात, असंही त्यांनी म्हटलं आहे.