एसबीआयच्या एटीएमवर ओटीपीशिवाय पैसे नाही मिळणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांच्या सुरक्षितेतसाठी एक नवीन प्रणाली सुरू केली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना दहा हजार किंवा दहा हजारपेक्षा जास्त रक्कम खात्यातून काढायची असल्यास ग्राहकांच्या मोबाइलवर एक ओटीपी येतो. तो ओटीपी टाकल्यानंतरच ग्राहकांना त्यांची रक्कम मिळू शकते.
शार्दूल चितळे (एसबीआय ग्राहक सेवा केंद्र, चिपळूण)

नवी दिल्ली : तुम्ही जर मोबाइल न घेता स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढायला गेलात तर, तुम्हाला पैसे काढता येणार नाहीत. कारण एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरवर येणारा ओटीपी टाकावा लागेल. एसबीआय एटीएममधून पैसे काढताना ओटीपी टाकल्याशिवाय कॅश निघणार नाही.

देशात सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. बँक एटीएमच्या माध्यमातून देखील फसवणूक केली जात आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे. ग्राहकांना सुरक्षितरीत्या एटीएममधून रोख रक्कम काढता यावी, यासाठी बँकेने नियमात बदल केला आहे.

त्यामुळे येथून पुढे स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढायला गेल्यास तुम्हाला हा नियम माहित असणे गरजेचे आहे. एटीएममधून पैसे काढताना तुमच्या मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. बँकेने म्हटले आहे की, ओटीपी आधारित कॅश विड्रॉल सिस्टिम एसबीआय एटीएमवर होणारी फसवणूक रोखण्यासाठी उचललेले पाऊल आहे.

ही नवीन सिस्टिम सायबर गुन्हेगारांना रोखण्यासाठी महत्त्वाची ठरेल, असे बँकेने म्हटले आहे. तसेच, ओटीपी हा १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी लागू असेल. १० हजार रुपयांखालील रक्कम विना ओटीपी काढता येईल. नियमानुसार, ग्राहकांना त्यांच्या बँक खात्याशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल, असे बँकेने कळवले आहे.

Prakash Harale: