मुंबई | Mohan Bhagwat’s On Sanjay Raut | ज्ञानवापी प्रकरण श्रद्धेचा विषय असून न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे असं सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याची किंवा दरदिवशी नवा वाद निर्माण करण्याची गरज नाही असंही म्हटलं आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोहन भागवतांच्या भूमिकेशी आपण सहमत असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. यावेळी ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
“मी मोहन भागवत यांच्या भूमिकेचं स्वागत करतो. मंदिरासाठी संघर्ष करण्यापेक्षा कश्मिरी पंडीतांचे प्राण कसे वाचवता येतील हे पाहणं गरजेचं आहे. मोहन भागवत बरोबर बोलले,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच मोहन भागवत यांनी “कशाला वाद निर्माण करायचा? प्रत्येक मशिदीत शिवलिंगचा शोध कशासाठी घ्यायचा?,” अशी विचारणा नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष अधिकारी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभात बोलताना केली आहे.
पुढे संजय राऊत म्हणाले, “या देशात, राज्यात आणि खासकरुन जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) काश्मिरी पंडीत, तेथील नागरिक अत्यंत धोक्याखाली आहेत. घरात, कार्यालयात घुसून त्यांना रोज मारलं जात आहे. कलम ३७० (Article 370) हटवल्यानंतरही परिस्थितीत काही बदल झालेला नाही.”