शासकीय आरोग्य उपकेंद्र बनलंय तळीरामांचा अड्डा
येरवडा : महापालिकेत तीन वर्षांपूर्वी समाविष्ट झालेल्या लोहगाव भागातील शासकीय आरोग्य उपकेंद्रात अद्याप डॉक्टर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली नाही. या उपकेंद्रातून डॉक्टरच गायब झाल्याने येथे येणाऱ्या रुग्णांनी न्याय मागायचा कोणाकडे? हा मुख्य प्रश्न नागरिकांना पडला अाहे.
दिवसाढवळ्या शासनाच्या नियमानांची पायमल्ली करून अनेक तरुण हे रुग्णालयाच्या आवारातच सर्रासपणे दारू पिण्याचा आनंद लुटत असल्याने हे रुग्णालय हे तळीरामांचा अड्डाच बनल्याने येथे येणाऱ्या नागरिकांना हे शासकीय रुग्णालय आहे की, तळीरामांचा अड्डा हा मुख्य प्रश्न सतावत असून अनेक वेळा ह्या दारुड्यांच्या दहशतीचा सामना नागरिकांना करण्याची वेळ येत आहे. विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावरच लोहगाव पोलीस चौकी असतांना देखील आजपर्यंत पोलिसांच्या वतीने अशा तळीरामावर कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्याने या भागातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून गावचा महापालिकेत समावेश करूनही आजपर्यंत गावास कोणत्याही प्रकारचा फायदा झाला नसून या ठिकाणी जर वैद्यकीय अधिकारीच नसेल तर ह्या रुग्णालयाचा खरोखरच रुग्णांना फायदा आहे का?आता हे पालिकेलाच समजणे काळाची गरज आहे.
— सोमनाथ खांदवे, विभागप्रमुख शिवसेना
लोहगाव ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी करून देखील पालिका आरोग्य केंद्र समस्येकडे पाठ फिरवून त्यांना केराची टोपली दाखवत आहे. झोपी गेलेल्या अधिकाऱ्यांना जाग येणार का? हा मुख्य प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. नागरिकांची मुख्य अडचण लक्षात घेऊन येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
लोहगाव भागातील ग्रामीण हद्दीत समावेश असल्यामुळे परिसरातली गोरगरीब नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातून जिल्हा परिषदेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून ग्रामपंचायत कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरच हे शासकीय आरोग्य उपकेंद्र उभारण्यात आले. त्यामुळे या भागातील गोरगरीब नागरिकांची असणारी मुख्य समस्या मार्गी लागली होती. मात्र तीन ते साडेतीन वर्षांपूर्वी लोहगावचा नव्यानेच महापालिकेत समावेश करण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या वतीने नेमण्यात आलेले डॉक्टर व कर्मचारी यांची बदली करण्यात आली. मात्र गेल्या तीन वर्षांपासून या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पालिका आरोग्य विभागामार्फत नेमणूकच करण्यात न आल्याने रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येत आहे. लोहगवसह, वडगाव शिंदे, निरगुडी या ग्रामीण भागातून रुग्ण या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असतात. मात्र कर्मचाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी कोणी अधिकारीच नसल्याने कर्मचाऱ्यांचा येथे मनाचा कारभार चालू असल्याचे दिसत आहे.
दोन दिवसापूर्वी आरोग्य उपकेंद्रास कर्मचाऱ्यांनी चक्क टाळे ठोकल्यामुळे येथे कर्मचाऱ्यांचा मनाचा कारभार दिसून आला. याचा नाहक त्रास रुग्णांना सहन करण्याची वेळ येत आहे. एकूणच पालिका आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास महापालिका असमर्थ ठरल्याचे यावरून स्पष्ट होत असून ते नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे.