नवी दिल्ली | Noida Twin Tower Demolition – नोएडातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेलं महाकाय ‘ट्विन टाॅवर’ अखेर जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे. 9 वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर ‘एपेक्स’ आणि ‘सेयान’ हे ‘सुपरटेक’ कंपनीच्या मालकीचे महाकाय टॉवर्स पाडण्यात आले आहेत. ‘एपेक्स’ ही इमारत 32 मजली तर ‘सेयान’ 29 मजल्यांची इमारत होती. या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्यानंतर लगतच्या परिसरामध्ये धुळीचं साम्राज्य निर्माण झालं आहे. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचं काम देण्यात आलं होतं.
कुतुबमिनारपेक्षाही उंच असलेलं हे ट्विन टाॅवर तब्बल 3 हजार 700 किलो स्फोटकांचा वापर करून पाडण्यात आलं आहे. या पाडकामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या पाडकामादरम्यान नोएडा परिसरात 560 पोलीस, 100 राखीव दलाचे जवान आणि चार एनडीआरएफच्या (NDRF) टीम तैनात करण्यात आल्या होत्या. तसंच नोएडातील सेक्टर 93 A मधील ‘एमराल्ड कोर्ट गृहनिर्माण’ प्रकल्पातील या टॉवर्समध्ये 850 फ्लॅट्स होते.
नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेसवे लगत बांधण्यात आलेल्या या टॉवर्सची उंची 100 मीटर लांब म्हणजेच कुतुबमिनारापेक्षाही जास्त होती. या टॉवर्सचं पाडकाम हाती घेण्याआधी लगतच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. टॉवर परिसराचा जवळपास 500 मीटरचा भाग सील करण्यात आला होता.
दरम्यान, ट्विन टॉवर पाडण्याची तारीख 22 मे 2022 निश्चित करण्यात आली होती, परंतु तयारी पूर्ण झाली नसल्याचं नमूद करण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणांना वेळ दिला. यानंतर 22 ते 28 ऑगस्ट दरम्यान टॉवर पाडण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, यावेळीही टॉवर पाडण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती, मात्र संबंधित यंत्रणेनं प्राधिकरणाला पत्र देऊन ट्विन टॉवर कमकुवत झाल्यामुळे धोक्याची भीती व्यक्त करत 28 तारखेपर्यंत तो पाडण्याची सूचना केली होती.