राज ठाकरेंविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

संजय राऊतांनाही न्यायालयाचे समन्स

मुंबई : राज्यसभेच्या व विधान परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात सांगलीतील शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. वॉरंट हुकूम बजावूनही ते हजर न राहिल्याने न्यायालयाने काल त्यांना पुन्हा अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी रेल्वे भरतीमध्ये २००८ मध्ये ‘स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या,’ या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात कल्याण कोर्टाच्या आदेशाने राज ठाकरेंवर अटकेची कारवाई झाली होती. या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला होता. त्यावेळी जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास दुकानदारांना भाग पाडलं होते. दरम्यान, विनापरवाना बंद पुकारल्यामुळे शिराळा पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे या खटल्यात राज ठाकरेंना ११ जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वारंवार गैरहजर राहिल्याने शिराळा न्यायदंडाधिकार्‍यांनी २८ एप्रिल २००२ रोजी राज ठाकरे यांच्यासह १० जणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. याप्रकरणी ८ जूनला सुनावणी झाली. या सुनावणीला राज ठाकरे गैरहजर राहिले. यानंतर कोर्टाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढलं आहे.


कोरोनाची लागण झाल्याने राज काल झालेल्या सुनावणीला गैरहजर राहिले असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या सुनावणीसाठी मनसेचे नेते शिरीष पारकर उपस्थित होते. त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. पण राज ठाकरे गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात पुन्हा एकदा अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलं आहे. आता यामुळे राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील सुनावणीसाठी तरी राज ठाकरे उपस्थित राहणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.


दरम्यान, शिवसेनानेते आणि खासदार संजय राऊत यांना मुंबईतील शिवडी न्यायालयाने समन्स बजावले आहे. भाजपनेते किरीट सोमय्या यांच्या पत्नीने दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीनंतर राऊत यांना हे समन्स बजावण्यात आले आहे. त्यानुसार राऊत यांना चौकशीसाठी ४ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. शिवसेनानेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर विक्रांत घोटाळा, टॉयलेट घोटाळ्यात मोठे घोटाळे केल्याचे गंभीर आरोप केले होते. तसेच आगामी काळातही सोमय्यांचे अनेक घोटाळे उघडकीस येतील, असा दावा केला होता. त्यानंतर सोमय्यांच्या पत्नीने याप्रकरणी राऊतांविरोधात ९ मे रोजी नवघर पोलिस ठाण्यात मानहानीची तक्रार दाखल केली होती.

Sumitra nalawade: