आता निवडणुकीतील प्रत्येक क्षण टिपणार ७५ कॅमेरे…

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या काही महिन्यांमध्ये होणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. प्रभागरचना पूर्ण झाली असून, आता मतदारयाद्या देखील प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
या निवडणुकीचे व्हिडीओ चित्रीकरण व फोटोशूट करण्यात येणार आहे. तब्बल ७५ कॅमेर्‍यांच्या मदतीने निवडणुकीचा प्रत्येक क्षण व हालचाल टिपली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केव्हाही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी इच्छुक कामाला लागले आहेत. महापालिका प्रशासनाच्या वतीने देखील या निवडणुकीची तयारी केली जात आहे. निवडणुकीचे चित्रीकरण व फोटोशूट करण्यात येणार आहे.

डिजिटल संग्रह ठरतो फायदेशीर
सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रत्येक क्षणाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. महापालिका कारभारामध्ये याचा फायदा होत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. तसेच निवडणुकीतील महत्त्वाचे क्षण संग्रह करून ठेवता येतात. भविष्यामध्ये त्याचा चांगल्या कामासाठी, तसेच कायदेशीर पेच निर्माण झाल्यास वापर करता येतो. त्यामुळे असा डिजिटल संग्रह ठेवणे फायदेशीर असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

त्यासाठी ७५ कॅमेरे व ऑपरेटर हे काम करणार आहेत. निवडणुकीच्या काळात ४५ दिवसांसाठी हे काम दर्शन डिजिटल व्हिडीओग्राफी या संस्थेला देण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने निविदा प्रसिद्ध केली होती. चिंचवड येथील मेसर्स दर्शन व्हिडीओग्राफी या संस्थेने १३७० रुपये प्रतिदिन प्रति कॅमेरा ऑपरेटरसह या पद्धतीने दर सादर केला. त्यांचा दर लघुत्तम असल्याने तो स्वीकारण्यात आला आहे. त्यानुसार ४६ लाख २३ हजार ७५० रुपये खर्च होणार आहे. त्याला महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली आहे.

Dnyaneshwar: