नाशिक : राज्याचे पवार आणि पवार कंपनीने वाटोळे केले आहे. या राज्यास आता पवारांपासून वाचवण्याची वेळ येऊन ठेपली असून राज्यातील सरकार सध्या बारामती वरून चालतं असल्याची खरमरीत टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केली आहे. सदाभाऊ खोत यांचं ‘जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा’ हे राज्यव्यापी अभियान सुरु आहे. ते आज नाशिक येथे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले, जागर शेतकऱ्याचा आणि आक्रोश महाराष्ट्राचा अभियान आम्ही सुरू केले आहे. त्यातून शेतकऱ्यांचा राज्य सरकारवरील रोष आणखी कळत आहे. कोरोना काळ संपला असला तरी सरकारचा मात्र अद्याप कोरोना संपत नाही हे दुर्दैव आहे. सरकारी तिजोरीवर सरकार दिवसाढवळ्या दरोडा टाकत आहे. हा दराडो लपवण्यासाठी सरकार रोज वेगवेगळे विषय काढत आहे.
पुढे शिवसेनेवर टीका करत ते म्हणाले, शिवसेनेची सत्ता आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याचे दहा हजार भरणार हे आश्वासन देण्यात आले होते. दहा हजार सोडा शेतकऱ्यांची वीज सरकार कापू लागले आहे. दूसरीकडे आमची सत्ता आल्यानंतर आम्ही वीज मोफत देऊ असे अजित पवार यांनी सांगितले होते. त्याचे काय झाले? असा सवाल खोत यांनी उपस्थित केला आहे. पीक विमा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अद्याप दिलेले नाहीत ही शोकांतिका म्हणावी लागेल, असंही खोत म्हणाले आहेत.