भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला आता फारच गांभिर्याने घेतले आहे. युतीमध्ये निवडणूक जिंकल्यावर शिवसेनेनी ज्या प्रकारे महाविकास आघाडीचे सरकार निर्माण केले त्यामागचे सूत्रधार शरद पवार होते. प्रादेशिक पक्षांवर विश्वास ठेवला तर कसा फटका बसतो, याचा अनुभव आल्यावर आता भाजप-शिवसेनेला सैरभैर करून राष्ट्रवादीला निशाण्यावर घेत आहे.
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील ४८ जागा मिळवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. शिंदेगट त्यांच्यासोबत असेल, असे आज तरी दिसत आहे. राजकारणात कोण कोणाचा कधी मित्र होईल आणि कोण कोणाचा शत्रू हे सांगता येत नाही. तसेच कोण कोणाला कुठल्या बंद दाराआड वचन देईल, हेपण सांगता येत नाही. सबब आपण सध्या आजच्या चित्रावर बोलूया, तर भारतीय जनता पक्ष मिशन ४८ च्या मानसिकतेत आहे. त्याचा एक भाग म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीवर निशाणा साधण्याच्या तयारीत आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर बारामतीची जबाबदारी देण्यात आली आहे.
ही जबाबदारी पार पाडण्यासाठी त्या दि. १६ ऑगस्टपासून पुणे दाैऱ्यावर आहेत. बारामतीकर नेहमी सावध असतात. तयारीत असतात. यावेळी ते अधिक तयारीत असतील. सुप्रिया सुळे यांना खासदार करणेही त्यांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा असेल आणि भारतीय जनता पक्षालाही प्रतिष्ठेचा मुद्दा गौण करायचा आहे. महाराष्ट्रात एकेकाळी काँग्रेसनंतर कोणाचे चालायचे तर (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचे. त्यानंतर कोणाचे चालते किंवा राजकारणाचा केंद्रबिंदू कोण असेल तर ते शरद पवार हे समीकरण होते. मात्र शिवसेनेला आणि विशेषतः बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसांना सैरभैर करून शिवसेना कमकुवत झाली आहे. केवळ ठाकरे परिवारापुरती शिल्लक आहे, हे भाजपने दाखवून दिले आहे. आता प्रादेशिक पक्ष संपवण्याच्या मोहिमेत दुसरा महत्त्वाचा पक्ष राहतो तो राष्ट्रवादी काँग्रेस. या पक्षालाही अस्थिर करण्यासाठी आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणातले शरद पवार यांचे महत्त्व कमी करण्यासाठी भाजप आता तयारीला लागला आहे. खरे तर गेल्यावेळीच सुप्रिया सुळे यांना जिंकून येण्यासाठी कष्ट घ्यावे लागले होते. त्यापूर्वी ही भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर महादेव जानकर यांनी निवडणूक लढवली असती तर सुप्रिया सुळे जिंकणे अवघड झाले असते. मात्र त्यावेळी सुळे पराभवाच्या सापळ्यातून सुटल्या. त्यापूर्वी माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीतून शरद पवार यांनी चक्क पराभवाच्या अंदाजाने माघार घेतली होती, असेही मत जाहीर आहे.
आज माढा मतदारसंघ रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या ताब्यात आहे आणि पाणीप्रश्नावरून तिथे आता पवार घराण्यातले कोणी उभे राहणार नाही, हेही सत्य आहे. थोडक्यात स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना पराभूत करण्यसाठी अथक पाच वर्षे प्रयत्न केले. पहिल्यांदा त्या पराभूत झाल्या, मात्र आता राहुल गांधी वायनाडशिवाय जिंकून येणे अवघड आहे. भाजपने माढा मोहीम फत्ते केली. आता बारामतीची वेळ आहे.राज्याच्या राजकारणात ज्याचे भय आहे. दबदबा आहे त्याचा दबदबा संपवण्याचे मिशन भाजपने हातात घेतले आहे. शिंदे गट फुटताना त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता.विकासकामांना राष्ट्रवादी पक्ष शिवसेनेला कमी निधी देतो, असा मोठा गवगवा त्यांनी करीत राष्ट्रवादीला खलपुरुष ठरवले आहे.
अजित पवार यांच्याबद्दल संशय निर्माण केला आहे. सध्याचे ठाकरे घराणे निष्क्रिय आहे, हा शिक्का जसा उद्धव ठाकरे यांच्यावर मारला, तसा पवार घराणे सत्तेसाठी अतिमहत्त्वाकांक्षी आहे, हे सांगणे आणि जनमानसावर बिंबवणे कधीच सुरू झाले आहे. काँग्रेसला शरद पवार त्यांच्या पक्षातून फुटून गेले तरी त्यांच्याबद्दलचे भय कमी करता आले नाही. त्यामुळे सत्तेसाठी शरद पवार यांनी केलेले सगळे अपमान सोसून मविआमध्ये काँग्रेस सहभागी झाली. भाजप नेमके उलट करीत आहे. पंतप्रधान मोदींनी जाहीरपणे गुरू म्हणून ज्यांना संबोधले त्यांचे राजकीयदृष्ट्या खच्चीकरण करण्याचे प्रयत्न ताकदीने सुरू केले आहेत.ते पवारांचे खच्चीकरण करतील किंवा आपल्या नियम, अटीवर त्यांना ताब्यात ठेवतील.कारण शिवसेना झाली, आता वेळ आहे राष्ट्रवादीची…!