“आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी लढा उभारावा लागेल” : संभाजीराजे छत्रपती

पुणेSambhajiraje Chhatrapati On Maratha Reservation : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज (12 ऑगस्ट) पुण्यात मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा लढा द्यावा लागेल असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे. काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे उपोषणाला बसले होते. त्यांना महाविकास आघाडी सरकारकडून आरक्षण देण्याबाबत आश्वासन देण्यात आले होते.

“ज्यांनी मराठा आरक्षण दिलं होतं ते देवेंद्र फडणवीस आणि मी उपोषण केलं असताना ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं ते एकनाथ शिंदे यांचं सध्या सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सगळं माहिती आहे. ते मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा लढा उभारावा लागेल.” असं वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. “मराठा समाजाला सामाजिक मागास ठरविण्यासाठी आयोग नेमावा. त्यासाठी तातडीने बैठक बोलावून त्या बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आमंत्रित करावे आणि मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा प्रक्रिया करावी.” असंही संभाजीराजे यावेळी म्हणाले.

शिवसेनेकडून अपेक्षाच नाही

“शिवसेनेने शब्द पाळला नाही. मला खासदारकी दिली नाही. हा माझ्यासाठी इतिहास आहे. त्यांच्याकडून माझी काहीच अपेक्षा नाही. ‘स्वराज्य’च्या माध्यमातून आता अनेक सामाजिक कामं हाती घेतलेली आहेत. ‘स्वराज्य’च्या मध्यमातून पक्ष काढणं सोप नाही. त्यासाठी अनेक गोष्टी लागतात. मात्र, पश्न सुटत नसले तर भविष्यात नक्कीच पक्ष काढण्याचा विचार करू” असं स्पष्टीकरण संभाजीराजे यांनी दिलं.

दीपक केसरकरांना पर्यटन खातं मिळावं

नुकताच शिंदे सरकारने मंत्रिमंडळ विस्तार केला आहे. मात्र, कोणत्या मंत्र्यांना कोणती खाती मिळतील याबाबत अजून माहिती बाहेर आलेली नाही. दरम्यान, संभाजीराजे यांनी दीपक केसरकर यांना पर्यटन खातं मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. केसरकर यांच्या माध्यमातून रायगड सोबतच महाराष्ट्राच्या पर्यटनाचा विकास होईल आणि महाराष्ट्राचे पर्यटन देशभरात पोहोचेल अशी अशा त्यांनी व्यक्त केली आहे.

Dnyaneshwar: