सासवड ः कोरोनाच्या काळात बंद पडलेल्या एसटीने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पुन्हा प्रवाशांच्या सेवेत येणे अपेक्षित होते; परंतु आपल्या मागण्यांसाठी तब्बल पाच महिने सामान्य जनतेला वेठीस धरले. याच संधीचा फायदा घेऊन पीएमपीएमएलने महत्त्वाच्या शहरांबरोबरच तालुक्याच्या ग्रामीण भागात चांगलेच जाळे उभारले आहे. साहजिकच प्रवाशांना आता वेळेत आणि कमी पैशात सेवा मिळू लागल्याने कमी वेळेत बसचा विस्तार झाला. मात्र तब्बल पाच महिन्यांनंतर रस्त्यावर सुरू होत असलेल्या एसटीला मोठ्या कसोटीचा सामना करावा लागणार असून, वर्षानुवर्षे प्रवास करणारे प्रवासी पुन्हा आपल्याकडे वळविणे आणि त्यांच्यात विश्वासार्हता निर्माण करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
ग्रामीण भागात एसटीला लालपरी, राणी म्हणूनही संबोधतात. परंतु कोरोनाचा काळ सुरू झाला आणि इतर सेवेबरोबरच एसटी सेवाही बंद करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. नागरिकांकडून एसटी सुरू करण्याची मागणी होत असताना प्रशासनाने त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. याच संधीचा फायदा घेऊन पुणे येथील पीएमपीएमएल व्यवस्थापनाने प्रवाशांची गरज ओळखून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात शिरकाव करण्यास सुरुवात केली. नागरिकांच्या वाहतुकीची व्यवस्था झाल्याने त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. ज्या भागात एसटी कधीच वेळेवर जात नव्हती अशा भागातही बससेवा सुरू करण्यात आली.
पुरंदर तालुक्याच्या सासवड शहरासह जेजुरी, नीरा, मोरगाव, वीर, परिंचे गराडे, वाघापूर, उरुळी कांचन, यवत अशा सर्वच मार्गांवर बससेवा सुरू केली. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, हवेली, शिरूर, रांजणगाव, खेड, मंचर, नारायणगाव, लोणावळा, केडगाव, कुरकुंभ आणि इतर भागांत बससेवा सुरू केली; परंतु दीर्घ कालावधीनंतर एसटी प्रशासनाला आपल्या प्रवाशांची विश्वासार्हता जपण्याचे आव्हान आहे. ग्रामीण भागात बससेवा जलद दिली जात आहे. त्याच वेळी एसटी प्रशासन मात्र अजूनही जुन्याच सवयीवर अवलंबून आहे. वेळेत सेवा न देणे, एसटी बसस्थानकात झालेले खासगी आणि अवैध प्रवाशांचे जाळे तोडणार का, या सर्व बाबींचा विचार करता ग्रामीण भागात पुन्हा आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी एसटीला चांगलेच झगडावे लागणार आहे.