काँग्रेसचे भरकटलेले तारू जागेवर आणण्याची यांची क्षमता नाही, मात्र राज्यसभेत सत्तारूढ पक्षावर हल्ला करण्यासाठी ही मंडळी उपयोगी आहेत. त्यांना राज्यसभेबाहेर ठेवणे काँग्रेसला परवडणारे नाही. राज्यसभेची निवडणूक महत्त्वाची आहे. राज्यसभेत अभ्यासू, विद्वान मंडळी आपल्या अनुभवासहित ज्ञानाने जनकल्याणाचे काम करीत असतात. साहजिकच राज्यसभेत बळ वाढवण्यासाठी सगळेच पक्ष कंबर कसत आहेत.
राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. दिनांक १० जूनला निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक ११ जागांसाठी मतदान होणार आहे, तर महाराष्ट्र्रात ६ जागांसाठी मतदान होईल. या निवडणुकीच्या रिंगणात छत्रपती संभाजीराजे यांनी उडी घेतली आहे. त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा मोठी आहे. राज्यसभेत जायचे आहे, मात्र त्यासाठी त्यांच्या अटी, शर्ती आहेत आणि त्या राजकीय पक्षांनी मान्य कराव्यात, अशी त्यांची आग्रहाची भूमिका आहे. ते राजकीय पक्ष काढण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना इतर राजकीय पक्षांनी मदत करायची आहे. मात्र ते कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधीलकी ठेवणार नाहीत. निवडणुकीसाठी ते अपक्ष असतील. आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांनी समाजाला, स्वराज्य उभारणीसाठी योगदान दिले त्याची जाणीव राजकीय पक्षांनी ठेवून आणि त्यांनी (छत्रपती संभाजी महाराजांनी) केलेल्या लोकोपयोगी कामाच्या बळावर बिनविरोध निवडून द्यावे, असे त्यांचे म्हणणे आहे.
मराठा आरक्षण हा खरेतर त्यांचा जिव्हाळ्याचा आणि कामाचा विषय. त्यांनी राज्य सरकारला दिलेले निर्वाणीचे इशारे, आंदोलने, तसेच घेतलेल्या गाठीभेटी याचा आरक्षणासाठी किती उपयोग झाला हे समजत नाही. मात्र आरक्षण मिळाले नाही हे वास्तव आहे. अर्थात त्यांचे प्रयत्न यामुळे कमी ठरत नाहीत आणि त्यांच्या हेतूबद्दल शंका घेता येणार नाही. अर्थात हा लढा कायम ठेवण्यासाठी आपली जागा कमी करून कोणता पक्ष त्यांना पाठिंबा देईल हे समजत नाही आणि पाठिंबा दिला तर तो नक्कीच सशर्त असेल. शर्त समजणार नाही. गुलदस्त्यात राहील. छत्रपती संभाजीराजांनी राष्ट्रपती निर्वाचित सदस्यत्वाची मुदत संपल्यावर पहिल्यांदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आभार मानले, पण राजकीय चर्चाही झाली आणि ती त्यांना मुख्य राजकीय प्रवाहात आणण्यासंदर्भात असेल यात शंका नाही. त्यापूर्वी कोल्हापुरात मविआच्या मंत्रिमंडळातले काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी त्यांना काँग्रेसमध्ये यावे, अशी विनंती केली, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांच्या बाजूने संभाजीराजांना विरोध केला नाही.
अर्थात पवार शेवटच्या क्षणापर्यंत कोणाची बाजू घेतील हे सांगता येत नाही आणि त्यांचा होकार म्हणजे होकार असेल यावर ते ठाम असतील, हे पण कोणी नक्की सांगू शकणार नाही. मात्र असे असले तरी सहावी जागा जर कोणी चुरशीने उतरले नाही तर राजे राज्यसभेत जातील. भारतीय जनता पक्षाने छत्रपती शिवरायांच्या वंशजांना राज्यसभेवर नियुक्त करण्यात चतुराई दाखवली आहे. सातार्याचे छत्रपती उदयनराजे भोसले यांनाही राज्यसभेवर नियुक्त केले. खरेतर मागे डोकावले तर खा. उदयनराजे भोसले यांना भारतीय जनता पक्षानेच महसूल राज्यमंत्री केले होते. त्यानंतर ते काँग्रेस, राष्ट्रवादी आणि लोकसभेवर निवडून आल्यावर पुन्हा खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढले, पराभूत झाले. मात्र भारतीय जनता पक्षाने त्यांना राज्यसभेवर घेत पुन्हा खासदार केले. मराठा समाज आज या दोन्ही छत्रपतींवर मनापासून प्रेम करतो. राज्यातील जनता त्यांना छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून त्यांचा आदराने सन्मान करते.
याचा फायदा भाजपला नक्की होतो. होईल. राज्यातल्या सहा जागांपैकी भाजपला दोन जागा नक्की मिळतील. तिसरी जागा मिळवण्यासाठी त्यांना थोडे प्रयत्न करावे लागतील. सध्या भाजपकडे १०६ आमदार आहेत. पहिल्या पसंतीसाठी ४१.०१ टक्के मतदान आवश्यक आहे. म्हणजे साधारणपणे ३६, ३६ आमदारांची मते दोन सदस्यांना मिळतील. उरतील २४ सदस्य आणि तिसरा सदस्य निवडून आणायचा असेल तर किमान १२ जणांची मते भाजपला मिळवावी लागतील. अपक्ष आणि इतर जणांना फोडून ती ते मिळतीलही. मतदान गुप्त नसणार त्यामुळे पक्षाची मते फुटणार नाहीत. त्यामुळे लहान पक्ष आणि अपक्षांना किंमत येणार आहे. निवडणुकीत चुरस येणार आहे. एकूण ५७ जागा आहेत. त्यात महाराष्ट्रातले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, डॉ. विनय सहस्रबुद्धे, डॉ. विकास महात्मे हे निवृत्त होत आहेत. यातील गोयल, सहस्रबुद्धे आणि महात्मे यापैकी एकजण पुन्हा राज्यसभेवर जातील. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल तर शिवसेनेचे संजय राऊत हे कायम राहाणार यात शंका नसावी.
भाजपचे मुख्तार अब्बास नक्वी, काँग्रेसचे जयराम रमेश, कपिल सिब्बल, पी. चिदंबरम, अंबिका सोनी ही मंडळी निवृत्त होत आहेत. राज्यसभेत ही मंडळी आवश्यक आहेत. काँग्रेसचे भरकटलेले तारू जागेवर आणण्याची यांची क्षमता नाही, मात्र राज्यसभेत सत्तारूढ पक्षावर हल्ला करण्यासाठी ही मंडळी उपयोगी आहेत. त्यांना राज्यसभेबाहेर ठेवणे काँग्रेसला परवडणारे नाही. राज्यसभेची निवडणूक महत्त्वाची आहे. राज्यसभेत अभ्यासू, विद्वान मंडळी आपल्या अनुभवासहित ज्ञानाने जनकल्याणाचे काम करत असतात. साहजिकच राज्यसभेत बळ वाढवण्यासाठी सगळेच पक्ष कंबर कसत आहेत. अशावेळी राज्यसभेची गरिमा वाढवत त्यांनी काम करावे, ही प्रामाणिक इच्छा जनतेची आहे.