Nutrition : आरोग्यदायी शाळेचा डबा

शालेय जीवनात ही मुले-मुली अतिशय क्रियाशील असतात. दिवसभर चालणारी शाळा, शाळेतील खेळ, घरी परतल्यानंतर पुन्हा खेळणे, सायकल चालविणे, दोरीच्या उड्या मारणे, पोहणे असे विविध खेळांचे प्रकार त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा महत्त्वाचा भाग असतो. या वयातील मुलांच्या पालकांच्या तक्रारीदेखील खूप असतात, कारण मुलांना खाण्यापेक्षा खेळण्याचा जास्त नाद असतो.

आईची काळजी तर खूप जास्त वाढते आणि इतक्या जास्त अ‍ॅक्टिव्हिटीसाठी लागणारी एनर्जी कशी भरून काढावी? मुलांना डब्यामध्ये काय द्यावे? तेव्हा शाळेच्या डब्यातसुद्धा कलरफुल व नावीन्यपूर्ण पदार्थ असल्यास त्यांना खायला आवडतात. शाळेच्या डब्यांचे वाराप्रमाणे वेळापत्रक बनवता येईल. वेळापत्रक बनवताना आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या आवडीनिवडीच्या भाज्या यांचा विचार केला गेल्यास मुलांनाही एक समाधान वाटते. शाळेचा डबा आपण सकाळच्या सत्रासाठी घेणार आहोत का दुपारच्या सत्रासाठी, यावरूनही त्याचे प्रकार बदलू शकतात.

शाळेचा डबा देताना आपल्याला प्रथिने, कर्बोदके, व्हिटॅमिन असा संपूर्ण पोषक आहार द्यायचा आहे. यामध्ये सुकामेवा, दुग्धजन्य पदार्थ, पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य, धान्य यांपासून बनवलेले पदार्थ असणे आवश्यक असते. शक्यतो मोठ्या मधल्या सुटीसाठी पोळी-भाजी, पराठे, पुरी-भाजी, ईडली, भाताचे प्रकार असे पदार्थ द्यावेत, ज्यामुळे त्या वेळची भूक भागून मुलांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित होईल. मुलांचा नेमका आहार लक्षात घेऊन तितक्याच प्रमाणात द्यावे.

अतिरिक्त खाण्यामुळे अथवा डबा न संपल्यामुळे मुले अस्वस्थ होऊ शकतात. मुलांना दुपारच्या वेळी झोप येऊ शकते. म्हणून शक्यतो मुलांचे खाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन डबा द्यावा. त्यानंतर असणारी छोटी मधली सुटी यामध्ये चिक्की, घरगुती बटाटा केळी वेफर्स, चिवडा, फळे, मिश्र पिठाचे लाडू, राजगिरा लाडू, शेंगदाण्याचे लाडू असे पदार्थ देता येतील. लहान वयातच मुलांना घरच्या आहाराची सवय लावल्यास मुले शक्यतो बाहेरचा आहार घेणे टाळतात व त्यांचे आरोग्य उत्तम राहते.

ग्लोबलायझेशन, टीव्हीवर पाहणार्‍या अ‍ॅडव्हर्टाइजमेंट कोल्ड्रिंक, चॉकलेट, पिझ्झा, बर्गर यामुळे सुशिक्षित पालकांनादेखील याचे खूप कौतुक वाटते. यात चूक मुलांची नसून पालकांची आहे. कारण मुलांच्या आरोग्यासाठी कोणते पदार्थ चांगले आहेत, याचा थोडादेखील विचार न करता हे सुजाण पालक मुलांच्या आरोग्याशी खेळतात.

Dnyaneshwar: