मुंबई : ओबीसी आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला दणका दिला आहे. ओबीसी आरक्षणावरुन राज्यात रखडलेला निवडणूक कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला दिले आहेत. यासंदर्भात आता भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी पूर्वीच असं भाष्य केलं होतं, ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका आहे आणि ते आता सत्यात उतरताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय या मागची भूमिका महत्वाची आहे. सर्वोच्च न्यायालयात आपण गंभीरपणे ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यात अपयशी ठरलो, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणासमोरचं प्रश्नचिन्ह हे अजून गूढ होत चाललेलं आहे.”
“सर्वोच्च न्यायालायने सांगितलं आहे की निवडणुका जाहीर करा. पण तरीही राज्य सरकार आता काय भूमिका घेणार आहे? या निवडणुका जाहीर करण्यासाठी राज्य सरकाच्या अख्त्यारीत असणारा निर्णय राज्य सरकार घेणार आहे का? राज्य सरकार मंत्रीमंडळात एक विशेष निर्णय घेऊन, आम्ही ओबीसी आरक्षणाबरोबरच निवडणुका घेऊ अशी भूमिका घेणार आहे का? याकडे आता माझं लक्ष आहे.” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.