जीभ घसरतेच कशी?

नैतिकता शिकवून युवकांच्या स्वभावात बदल करणे किंवा या माध्यमांचा विघातक कामांसाठी वापर थांबवणे हेसुद्धा खूप अवघड उद्दिष्ट आहे. मोबाइलचा वापर करून आर्थिक फसवणुकीपासून चारित्र्यहननापर्यंत अनेक प्रकारचे गुन्हे घडत आहेत आणि या गुन्ह्यांवर वचक बसून ते थांबतील अशी परिस्थिती सध्या आपल्याकडे अस्तित्वात नाही. त्यामुळे जे सापडतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून ही प्रकरणे थांबवणे गरजेचे आहे.

राजकारणामध्ये सुसंस्कृतपणा आणि सभ्यता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. वैयक्तिक दोषारोप करताना आणि चारित्र्यहनन करताना ज्या भाषेचा उपयोग केला जात आहे ती निषेधार्ह आहे. अशाप्रकारे बोलताना वा लिहिताना बुद्धीची पातळी घसरतेच कशी हे समजत नाही. महाराष्ट्र राज्य देशामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिकद़ृष्ट्या दिशा देणारे राज्य म्हणून ओळखले जाते. ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकण्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा सिंहाचा वाटा आहे. अनेक स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारक महाराष्ट्र राज्याने देशाला दिले.

केवळ विचारवंत नव्हे तर विधायक रचनात्मक कार्य करणारे कर्मवीरही या राज्याने देशाला दिले. ‘स्वराज्य की सुराज्य’ या प्रकारच्या मतभिन्नता असणार्‍या चर्चा आणि परिसंवाद किंवा टोकाचे मतभेदही याच महाराष्ट्र राज्याने पाहिले. एकमेकांचा आदर ठेवत आणि वैचारिक विरोध करीत असताना अत्यंत सभ्य भाषेचा वापर करीत आपली मते आक्रमकतेने मांडली गेली. यामध्ये वैचारिक मतभिन्नता होती, तरीही टोकाची मनभिन्नता कधीच पाहायला मिळाली नाही. लोकशाहीमध्ये मत विरोधी असले तरी त्याचा आदर केला जातो आणि राजकारणातील प्रत्येक व्यक्तीने तर केलाच पाहिजे. ही सगळी सभ्य, सुसंस्कृत आणि सुविचारांची परंपरा गेल्या काही वर्षांत ज्या पद्धतीने विचारांची देवाणघेवाण होत आहे ती पाहात असताना कुठे लुप्त झाली हे समजण्यास मार्ग नाही.

भाषणांमध्ये खोचक बोलणे, टीका करणे, कोपरखळी किंवा टोपी उडवणे हे प्रकार सभ्यतेच्या मर्यादेत राहून व्यक्त केले तर मान्य होतात. विशेषत: समाजाच्या समोर जाहीर भाषण करताना याचे भान ठेवले जाते. समोर असणार्‍या गर्दीचा दबावही काही प्रमाणात वक्त्यांवर असतो. वक्ता फार वाहवत जाताना त्यामुळे दिसत नाही; परंतु समाजमाध्यमांवर प्रगट होण्याला ताळतंत्र राहिलेले नाही. वैचारिक मतभेद संपलेले असून, एक तर आमच्या बाजूचे किंवा आमच्या विरोधात अशा दोन गटांतच समाजमाध्यमांवर व्यक्त होणार्‍यांची वर्गवारी होते. त्यातून विरोधकांवर अक्षरश: गलिच्छ भाषेत टीका केली जाते तेव्हा ही समाजमाध्यमे का निर्माण झाली, असा प्रश्न सामान्यजनांना पडल्याशिवाय राहात नाही.

समाजमाध्यमांवर मत व्यक्त करताना कुणाचा धाक किंवा दबावगट थेट समोर नसतो. साहजिकच मनाला येईल त्या भाषेत लिहिले तरी कोणाचे काही बिघडत नाही, असा समज द़ृढ व्हायला लागला आहे. यात वय, पद, प्रतिष्ठा, एखाद्या व्यक्तीचे योगदान याचा अजिबात मुलाहिजा ठेवला जात नाही. आजमितीस राजकारणात जी मंडळी सर्वोच्च स्थानावर आहेत, महत्त्वाच्या सामाजिक, राजकीय पदांवर काम करीत आहेत अशा व्यक्तींच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात टीकाटिप्पणी केली जाते. गमतीचा भाग म्हणजे विरोधकांवर टीकाटिप्पणी करण्यासाठी एकनिष्ठ किंवा व्यावसायिक तत्त्वावर पैसे देऊन ट्रोेल करणार्‍यांची नियुक्ती केली जाते. अनेक फेक अकाउंट्स काढली जातात.

मोेबाइलचे क्रमांक खोटे दिले जातात आणि त्यातून यथेच्छ निंदानालस्तीचे कार्यक्रम पार पाडले जातात. यात कोणता एखादा पक्ष या प्रकारात भाग घेत नाही असे आता राहिलेेले नाही. अरेला कारे आणि पुन्हा त्या कारेला आरेे उत्तर देण्याचे कार्य अर्वाच्य भाषेत सध्या सुरू आहे. समाजमाध्यम साक्षरता होणे अत्यंत गरजेचे आहे. समाजमाध्यमांवर ज्या प्रकारे मजकूर प्रसारित केले जातात आणि समाजात वैरभाव तयार केले जातात; हा सगळाच प्रकार भारतासारख्या विविधतेमध्ये एकता असणार्‍या देशाला परवडणारा नाही. एकतेपेक्षा ध्रुवीकरणावर ज्या पद्धतीने जोर दिला जात आहे किंवा त्यासाठी दरी निर्माण केली जात आहे ते चित्र गंभीर आहे. समाजमाध्यमांचा वापर तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो.

युवापिढी तंत्रज्ञानामध्ये ज्येष्ठांपेक्षाही अधिक तज्ज्ञ आणि अनुभवी आहे. ज्येष्ठ मंडळी समाजमाध्यमांवर व्यक्त होताना फार मोठ्या प्रमाणात दिसत नाहीत. उलट युवकांचा ओढा समाजमाध्यमांवर अधिक आहे. साहजिकच तातडीने भडकणारी डोकी आणि ती पेटवून त्यात तेल ओतण्याचे काम समाजमाध्यमांमधून केले जाते. समाजमाध्यमांवर एखाद्या मजकुराचा प्रसारित होण्याचा वेग अफाट आहे. त्यावर नियंत्रण घालेपर्यंत ते लिखाण, चित्र किंवा ध्वनी अक्षरश: लाखोे लोकांपर्यंत पोहोचलेला असतो. अत्यंत कमी खर्चात खूप व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी हा मार्ग सहजसोेपा आहे आणि त्यामुळेच सध्या या माध्यमातून निंदानालस्तीचे प्रमाण वाढत चाललेले दिसत आहे. यावर नियंत्रण आणणे सोपे नाही. यासाठी आता नैतिकता शिकवून युवकांच्या स्वभावात बदल करणे किंवा या माध्यमांचा विघातक कामांसाठी वापर करणे थांबवणे हेसुद्धा खूप अवघड उद्दिष्ट आहे.

मोबाइलचा वापर करून आर्थिक फसवणुकीपासून चारित्र्यहननापर्यंत अनेक प्रकारचे गुन्हे घडत आहेत आणि या गुन्ह्यांवर वचक बसून ते थांबतील अशी परिस्थिती सध्या आपल्याकडे अस्तित्वात नाही. त्यामुळे जे सापडतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून ही प्रकरणे थांबवणे आजच्या घडीला गरजेचे आहे.

Dnyaneshwar: