गुरुदत्त सोनसुरकर | Sunday Mateeny |
एक छोटा पुरुष असतो आणि एक मोठा पुरुष. दोघांना एकमेकांबद्दल खूप प्रेम, जिव्हाळा असतो. छोट्या पुरुषाचा हीरो असतो मोठा पुरुष. आपण अगदी त्याच्याचसारखं बनायचं, असे मनसुबे आखत जेव्हा छोटा पुरुष मोठा होतो तेव्हा त्याला मोठा पुरुष चुकीचा वाटायला लागतो… जोवर तो मोठा पुरुष त्याच्या आयुष्यातून निघून जात नाही…
बाप-मुलगा या नात्याची वीण ही थोडी ताणलेली असते किंवा असायची, अपवाद कदाचित आजची बापांची पिढी, जी आपल्या पोरांना “जा बेटा. जी ले अपनी जिंदगी” म्हणते किंवा खुल के संवाद राखते.
लेखकद्वयी सलीम-जावेद यांच्यातल्या जावेद अख्तर यांचं आपल्या वडिलांबरोबर असंच ताणलेलं नातं होतं म्हणे आणि सलीमसाब यांचे वालिद होते पोलिस अधिकारी.
इस में कोई शक नहीं के १९८२ चा रमेश सिप्पी दिग्दर्शित “शक्ती” हा सलीम-जावेद यांच्या कामांमध्ये खूप अस्सल आणि वेगळा आहे. याच्या पटकथेत काहीही चमकदार वळणं नाहीत ना कथेत खूप पात्रं. तरीही शक्तीमध्ये खरोखरच एक वेगळी शक्ती आहे प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या हलवून सोडण्याची. खरंतर शक्ती हा १९७४ च्या शिवाजी गणेशन सरांच्या एका सुपरहिट तमिळ सिनेमाची जराशी वेगळी आवृत्ती आहे. शोलेनंतर रमेश सिप्पी एक मल्टिस्टारर शान करीत होता. घरच्या प्रॉडक्शनसाठी आणि निर्माते मुशिर – रियाझसाठी शक्ती. शिवाजी सरांच्या तमिळ सिनेमाच्या कथेचे हक्क सिप्पीने आधीच घेतले होते. मात्र शक्ती बनून पडद्यावर यायला सन १९८२ उजाडलं.
अर्थात, ज्या चित्रपटात दिलीपकुमार असतो तो चित्रपट काही साधं प्रकरण नसतं, या न्यायाने शक्तीलासुद्धा अनेक गमतीशीर जन्मकथा आहेत. परंतु सर्वात खरी आणि विश्वसनीय गोष्ट ही की शक्तीमध्ये आधी दिलीपसाबच्या मुलाच्या भूमिकेसाठी सलीम-जावेदची पहिली पसंती राज बब्बरच्या नावाला होती. (मात्र काहींच्या मते अमिताभ आणि दिलीपकुमारला घेऊन हाच चित्रपट १९७७ मध्ये सुरू झाला होता. ज्यात अमिताभ एका हेलिकॉप्टरमधून दिलीपसाबना भेटायला येतो, असं दृश्यही चित्रित केलं गेलं होतं.) अमिताभला जेव्हा दिलीपसाबच्या मुलाची भूमिका बब्बरला जातेय, हे कळलं तेव्हा त्याने दिलीपकुमारबरोबर काम करायला मिळावं, म्हणून स्वतः सलीम जावेदकडे शब्द टाकला. हीच गत अमिताभच्या आईचं काम करणाऱ्या अमिताभपेक्षा काही वर्षांनी लहान असणाऱ्या राखी गुलजारची होती. दिलीपकुमार नावाचं गारुड फक्त प्रेक्षकांवरच नव्हतं, तर इंडस्ट्रीमधल्या तालेवार स्टार्सवरही होतं, याचं हे उदाहरण.
शक्तीची कथा अश्विनीकुमार या कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याची आहे. लग्नानंतर थोड्या उशिराने झालेला मुलगा विजय. त्याच्या लाडाकोडात अश्विनीकुमार आणि त्याची पत्नी शीतल दंग असताना, जेके नावाचा स्मगलर छोट्या विजयचं अपहरण करतो. त्या बदल्यात त्याला अश्विनीकुमारने पकडलेला त्याचा एक साथीदार मुक्त करायला हवा असतो. आपल्या कर्तव्याला श्रेष्ठ मानणारा अश्विनी, माझ्या मुलाला मारलं तरी चालेल, असं फोनवर सुनावतो जे गुंडांच्या ताब्यातला लहानगा विजय ऐकतो. ती एक गोष्ट त्याच्या बालमनाला उद्ध्वस्त करून जाते. विजय त्या गुंडांच्या तावडीतून सुटतो, पण घरी आल्यानंतर मनातल्या मनात कुढत हळूहळू बापापासून दूर जाऊ लागतो. इतका, की तरुणपणी बापाच्या सल्ल्याविरुद्ध तो एका तस्कराकडे काम करू लागतो आणि अश्विनीसमोर पुत्रप्रेम की कर्तव्य, अशी कठीण परिस्थिती उभी राहते.
कानून की हिफाजत करनेवाला बाप किंवा भाऊ हे सूत्र घेऊन पार १९५० च्या दादामुनी अशोककुमार यांच्या संग्राम ते दिलीपकुमार-नासीर खान यांच्या गंगा जमुना (१९६१) ते अमिताभ बच्चन-शशी कपूर यांच्या दीवार (१९७५) पर्यंत अनेक चित्रपट येऊन भारतीय प्रेक्षकांना जिंकून गेले. मेहबूब खानच्या मदर इंडिया (१९५७) मध्येसुद्धा नर्गिसची राधा आपल्या बंडखोर मुलाला गोळी घालते.
शक्तीमध्ये वरकरणी हीच कथा वाटली तरी या सगळ्या चित्रपटांमध्ये शक्ती उजवा ठरतो, ते त्यातील पात्रांची मानसिक घालमेल, जडणघडण व्यवस्थित उभी केल्याने. आपल्या बापावर अतिशय प्रेम करणारा विजय, आपल्या बापापासून का तुटत जातो, ते प्रसंग अतिशय समर्पक आहेत. मग विजयने लोकल ट्रेनमध्ये केलेली मारहाण असो, की त्याच्यावर आलेला खुनाचा खोटा आळ. त्यात पोलिस असूनही आपली बाजू न घेणारा बाप त्याला शत्रू वाटू लागतो. त्याच वेळी कायद्याला आपलं काम करू देणारा अश्विनीकुमारसुद्धा प्रेक्षकांना चूक वाटत नाही. इतकंच काय, बऱ्याचदा प्रेक्षक या बाप-बेट्यांमध्ये चाललेला संघर्ष हा विजयची आई, अश्विनीकुमारची पत्नी शीतलच्या अगतिक पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतात आणि गंमत म्हणजे शक्ती चित्रपटाच्या आजवरच्या चर्चेत अतिशय दुर्लक्षिला गेलेला मुद्दा आहे हा. कसा?
‘शक्ती’ दिलीपकुमार आणि अमिताभ बच्चन या दिग्गज कलाकारांची जुगलबंदी म्हणून पाहिला जातो. खरंतर दिलीपकुमारसमोर असे कसलेले नट घेणं, जसं विधातामध्ये संजीवकुमार, सौदागरमध्ये राजकुमार आणि यांच्या कुस्त्या लावून थिएटर फुल करणं हा एक हुकमी व्यवसाय होता. त्या काळातल्या प्रेक्षकांची किंवा दिलीपसाबच्या चाहत्यांची मानसिकतासुद्धा अशीच असावी. दिलीपकुमारने अमुक अमुक को कच्चा खाया किंवा दिलीपकुमार के सामने अमुक अमुक कम नहीं पडा अशा चर्चा रंगत असत त्या थेट अंदाजपासून. इकडेही दिलीपकुमारचा एक चाहता आणि आता हिंदी चित्रपटसृष्टीचा नवा राजा अमिताभ आणि दिलीपकुमार यांच्यात कोण भारी अशा चर्चा अजूनही रंगतात. पण मला वाटतं, या सगळ्यात भारी पडली आहे ती आईचं काम केलेली राखी गुलजार आणि चित्रपटाला लाभलेला आईचा एक हळुवार दृष्टिकोन. अर्थात, दिलीपकुमार आणि बच्चन पडद्यावर असताना ही गोष्ट लक्षात येणं सोपं नाहीच. इकडे त्याकाळच्या प्रेक्षकांना दोष देण्याचा सवालच येत नाही. पण शक्ती आता परत एकदा पाहिला तर राखीने या दोन्ही पुरुषांना दिलेली अप्रतिम टक्कर किंवा साथ जाणवून जाते.
एका दृश्यात अश्विनी आणि विजयच्या झगड्यात विजयसाठी अश्विनीकडे मिन्नतवाऱ्या करणाऱ्या शीतलला विजय जेव्हा वैतागून म्हणतो, “माँ मेरे लिए किसीसे भीख माँगने की जरुरत नहीं.” तेव्हा शीतल पटकन त्याला तोडत म्हणते, “जरुरत हैं. मुझे जरुरत हैं.” आपल्या तत्त्वनिष्ठ पतीची भूमिका आणि आपल्या निर्दोष मुलाच्या भवितव्याच्या कात्रीत सापडलेली ही आई जितकी सलीम-जावेदने उत्तम लिहिली आहे, त्यापेक्षा कैकपटीने राखीने उभी केली आहे. बाकी दिलीपकुमारबद्दल काय लिहिणार. एकच म्हणेन अश्विनीकुमार या भूमिकेला लेखकांचं कितीही पाठबळ असलं तरीही दिलीपकुमार यांनी या पात्राला दिलेली एक सहृदय बापाची छटा आहे ती अन्यथा कर्तव्यकठोर वाटणाऱ्या या व्यक्तीला कर्तव्यदक्ष करते आणि महत्त्वाचं म्हणजे कुटुंबवत्सल करते.
विजयला दटावताना, समजावताना दिलीपकुमार यांनी क्वचितच आवाज उंचावला आहे. त्यांच्या डोळ्यातली मुलाची काळजी, मुलगा आपल्याला समजून घेत नाही, याचं शल्य दरवेळेला आपल्यालाही पेचात पाडत राहते. निव्वळ विजयला सहानुभूती मिळत नाही. पत्नीच्या मृत्यूनंतर मुलगा बापाचं दुःख ओळखून त्याच्या हातावर हात ठेवतो आणि रडतो, पण अश्विनी आपलं दुःख आवरून धरतो. आपल्या पोराला बाप असा तुटलेला बघवणार नाही, याची कल्पना असलेला हा अश्विनीकुमार. दिलीपकुमार या अनुभवी नटाने अतिशय विचारपूर्वक केलेली ही भूमिका अनेकांना भावखाऊ वाटते. अमिताभच्या विजयवर मात करणारी वाटते. पण अमिताभचा विजय हा त्याच्या त्या काळातील इतर भूमिकांपेक्षा (एक काला पत्थर वगळता) अतिशय वेगळी आहे. इतर ठिकाणी अमिताभच्या “विजय” चं बंड हे समाज आणि व्यवस्थेविरुद्ध असतं, इथे मात्र आपल्या बापामुळे तो कायद्याचा आणि सिस्टीमचा तिरस्कार करतो. त्याचं बंड हे आपला बाप आपल्यापेक्षा कायद्याला मानतो, यामुळे आहे.
एका प्रसंगात तो त्याच्या प्रेयसीला रोमाला म्हणतो, “कानून मेरा सौतेला भाई हैं.” खरं म्हणजे अमिताभने ही भूमिका अगदी प्रामाणिकपणे आणि दिलीपसाबचं कुठलंही दडपण न घेता, कुठलीही असुरक्षितता न बाळगता केलेली आहे. ज्या वेळी अमिताभ बच्चन हे नाव चित्रपटात सबकुछ म्हणजे कॉमेडी, ड्रामा, इमोशन असा एकपात्री प्रयोग करायचं तिथे शक्तीमधला विजय हा नेहमी मनात कुढत राहणारा आणि फारशा पंचलाईन्स नसणारा आहे. अगदी त्याची एन्ट्रीसुद्धा फार साधी, एका पत्र्याच्या टिन लाथ मारत निरुद्देश चालत आहे. कदाचित हीच गोष्ट दिलीप – अमिताभ ही जुगलबंदी बघायला गेलेल्या बच्चन फॅन्सना आवडली नसावी. शक्ती फारसा चालला नाही तेव्हा. निदान अपेक्षेप्रमाणे मोठा हीट झाला नाही. त्या वर्षी टॉपची कमाई करणारे चित्रपट होते विधाता आणि नमक हलाल. म्हणजे दिलीपकुमार आणि बच्चन यांच्या पंख्यांनी आपापल्या देवाचा सिनेमा चालवला होता. बिचाऱ्या रमेश सिप्पीचा शक्ती तसा उपेक्षितच राहिला.
आपल्या स्मिता पाटीलला मेनस्ट्रीम बॉलिवूड आणि बच्चनची नायिका बनवणारे १९८२ ला दोन चित्रपट आले. शक्ती आणि नमक हलाल. स्मिता पाटीलने रोमाची सरळ-साधी भूमिका अतिशय मोहकपणे केलीय. अमिताभला शोभणारी आणि तुल्यबळ ठरणारी एक नायिका खूप कालावधीनंतर मिळाली होती. स्मिता पाटीलची अकाली exit ही या otherwise सुपरहिट ठरू शकणाऱ्या जोडीला थांबवणारी घटना घडली. प्रेक्षकांचं दुर्दैव. आणि हो त्या काळात धडपडत असलेला अनिल कपूर सुद्धा शक्ती मध्ये अमिताभच्या तरुण मुलाच्या छोट्या भूमिकेत आहे. अनिल कपूर मोठा हीरो झाल्यावर कलकत्त्यात शक्ती तीन सुपरस्टार्सचा सिनेमा म्हणून पुन:प्रदर्शित झाला होता. तेव्हाही शक्तीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
रमेश सिप्पी आणि सलीम जावेद यांना मुळातच ही कथा तद्दन मसाला चित्रपट म्हणून मांडायची नव्हतीच. सिप्पीला तर गाणीही नको होती पण फिल्म विकलीच गेली नसती म्हणून आर डी ला पाचारण केलं गेलं. तीन साडे तीन गाणी आहेत शक्ति मध्ये. एक गाणं रेकॉर्ड होऊनही घेतलं गेलं नाही. आरडीने मिळालेल्या छोट्याशा संधीचं चीज केलेलं आहे मात्र जानें कैसे कब कहाँ, हम ने सनम को खत लिखा, मांगी थी इक दुआ अशी सुमधुर गाणी आहेत. आणि सगळ्यात powerful आहे ती शक्तिची थीम. अतिशय मोजक्या नोट्स मध्ये आटपणारी ही धून सिनेमाभर समयोचीत वाजत रहाते.
शक्ती ऐंशीच्या काळात फारसा चालला नाही. मात्र आताच्या काळात हा तीव्र भावनिक नाट्यमय सिनेमा मॅटिनीला तरी चालेल का? काय वाटतं?