कोलकाता : सध्या देशभरात हिंदू-मुस्लिम वाद उफाळून आनला जात आहे. त्यातच आता हनुमान चालिसा, मशिदीवरील भोंगे यांसारखे मुद्देही समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर त्या म्हणाल्या, आज देशात फूट पाडा आणि राज्य करा, हे धोरण राबवलं जातं आहे; पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. काही लोक हिंदू आणि मुस्लिमांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांचा डाव हाणून पाडा, असं आवाहन त्यांनी जनतेला केलंय. ईदनिमित्त जनतेला संबोधित करताना त्या बोलत होत्या.
दरम्यान, कोलकात्यात नमाज पठणानंतर ममता बॅनर्जी यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी केंद्र सरकारवर निशाणा साधत त्या म्हणाल्या, काही लोक अच्छे दिन लाएंगे असं सरकार म्हणत होते, पण कुठे आहेत अच्छे दिन? अच्छे दिनाच्या नावाखाली भाजप सरकार हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडत आहे पण घाबरू नका, मी याविरुध्द लढत राहीन. मी, माझा पक्ष किंवा माझं सरकार असं काहीही करणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं.
भाषणापूर्वी ममता बॅनर्जींनी ट्विट करून मुस्लिम समुहाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात त्यांनी लिहिलंय, प्रत्येकाला आनंद, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा! आपलं ऐक्य आणि एकोप्याचं नातं अधिक घट्ट होवो ही प्रार्थना. अल्लाह सर्वांना आशीर्वाद देईल, असं त्यांनी नमूद केलं.