दुःखाशी दोन हात करून स्वत:चं अस्तित्व निर्माण करता येते

स्वाती जैद, (मेकअप आर्टिस्ट)

त्येकाचा प्रवास हा वेगवेगळा असतो. काहींना जन्मजातच सुखाची चादर मिळते तर काहींना दुःखाचे काटे, परंतु प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने आनंदी आयुष्य जगत राहतो. खडतर परिस्थितीला सामोरे जातं अनेक लोकांनी स्वतःचं आयुष्य घडवलं आहे. अशात खडतर प्रवासाशी दोन हात करीत, आपल्याकडे असलेल्या कलागुणांना ओळखून स्वतःला त्या कलेत वाहून देणाऱ्या स्वाती बाळासाहेब जैद. यांचं मूळ गाव चिंबळी (ता.खेड) असून, त्यांचे प्राथमिक शिक्षण हे चिंबळी गावातील शाळेतच झाले. आई-वडील आणि त्या स्वत: असं त्यांचं कुटुंब. दहावीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचं लग्न झालं. त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती, पण संसारात गुंतल्याने शिक्षण थांबलं. तारेवरची कसरत करीत, संसार सांभाळत असताना, अनेक यातना सोसाव्या लागल्या. काही कौटुंबिक कारणास्तव त्या पतीपासून विभक्त झाल्या. हार न मानता पुन्हा नव्याने लढायला त्यांनी सुरुवात केली. परिस्थिती बदलली पाहिजे याची जिद्द ठेवत त्यांनी आपल्याला कर्तृत्वाने ती बदललीदेखील. गेली १० वर्षे झाली स्वाती जैद या आपल्या आई-वडिलांसोबत राहात आहेत.

त्यांना मेकअपची आवड असल्याने स्वतः चिंबळी भागात मेकअपचं पार्लर सुरू केलं. त्यांना त्या भागातील अनेक कार्यक्रमांच्या ऑर्डर मोठ्या प्रमाणात मिळतात. आपल्या या मेकअपच्या व्यवसायातून त्यांनी स्वतः वडिलांसाठी घर बांधलं आणि नुकत्याच काही दिवसांपूर्वी चारचाकी गाडीदेखील घेतली आहे. लग्नाचे नवरीचे मेकअप असो, प्रीवेडिंग शूट असेल अशा विविध कार्यक्रमांत त्या मेकअप आर्टिस्ट म्हणून जातात. अनेक मुलीदेखील त्यांच्याकडे मेकअप शिकण्यासाठी येत असून, अनेक गरजू मुलींना त्या आपली ही मेकअपची कला शिकवत असतात. कोणत्याही मुलीने शिक्षणाअभावी राहू नये यासाठी त्या प्रयत्न करीत अनेक मुलींना आर्थिक मदतदेखील करतात. श्री श्री रवीशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेत त्या स्वयंसेवक म्हणून सेवाही देतात.

युवा पिढीतील प्रत्येक मुलीला आणि स्त्रीला त्या सांगू इच्छितात की, कोणत्याही परिस्थितीत हार न मानता फक्त लढत रहा. दुःखाशी दोन हात करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करता येते .फक्त प्रामाणिक प्रयत्न करीत राहिले पाहिजे. संघर्ष हेच आयुष्य आहे. शून्यातून तुम्ही तुमची स्वप्नं पूर्ण करू शकता.
— नीलम पवार

Sumitra nalawade: