पक्षाच्या विस्तारासाठी काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिरात काही धोरणे ठरविण्यात आली आहेत. यापुढे एका कुटुंबात एकालाच उमेदवारी हे सूत्र निश्चित केले आहे. त्यामुळे पुण्यातील अनेक काँग्रेसजनांची पंचाईत होणार आहे.
पुणे : काँग्रेस पक्षाचे चिंतन शिबीर राजस्थान येथील जयपूर येथे नुकतेच झाले. २०२४च्या लोकसभा निवडणुकीला मोठ्या ताकदीने सामोरे जाण्यासाठी पक्षातील वर्षानुवर्षे सत्तापदे बळकावून बसलेल्या प्रस्थापितांना धक्का देण्याचे तंत्र अवलंबिण्यात येणार आहे. पक्षावरील प्रस्थापितांची पकड ढिली झाली तरच नव्यांना वाव मिळून पक्ष वाढेल याची जाणीव पक्षाध्यक्ष खासदार सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांना झाली. खासदार राहुल गांधी यांनी भाषणात यादृष्टीने अनेक मुद्दे मांडले.
पुणे महापालिकेत महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपद भूषविलेल्यांना महापालिकेची उमेदवारी देऊ नये असा प्रस्ताव काँग्रेस पक्षाचे नेते विठ्ठलराव गाडगीळ यांनी १९९२ साली मांडला होता.
पक्षाचे धोरण म्हणून त्यातील अनेक मुद्दे पक्षाने धोरण म्हणून स्वीकारले. त्यात एक कुटुंब, एक तिकीट असे ठरविण्यात आले आहे. याचा अर्थ काँग्रेस पक्ष यापुढे कोणतीही निवडणूक म्हणजे महापालिका, विधानसभा, लोकसभा यापैकी कोणत्याही निवडणुकीत कुटुंबातील एकाच व्यक्तीला उमेदवारी देणार आहे.काँग्रेस पक्षात प्रस्थापित नेत्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याऐवजी आपापल्या घरात, नात्यागोत्यातच खासदारकी, आमदारकी, विविध पदे देऊन ठेवली आहेत. लातूरमध्ये अमित देशमुख, धीरज देशमुख या दोन भावांकडे सत्ता आहे.
नांदेडमध्ये माजी मुख्य मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या नात्यागोत्यात पदे वाटली आहेत. सोलापूरमध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, त्यांची कन्या प्रणिती यांच्यातच खासदारकी, आमदारकी वाटप झाले. पुण्यात विश्वजित कदम आणि त्यांचे
काका चंदूशेठ कदम यांच्यात पदांचे वाटप झाले. प्रत्येक जिल्ह्यात, शहरात अशाच प्रकारच्या नात्यागोत्यांमध्ये तिकीट वाटप झाले आहे. पुणे महापालिकेची निवडणूक लवकरच येऊ घातलेली आहे. या निवडणुकीत बाप-लेक, बाप-कन्या, माजी आमदार आणि त्यांची दोन मुले, पती-पत्नी असे इच्छुक तयार झाले आहेत. प्रचारालाही लागले आहेत.
एका माजी मंत्र्यांना आपल्या मुलाला उमेदवारी द्यावयाची आहे. या सर्वांची काँग्रेस पक्षाच्या नव्या सूत्रानुसार पंचाईत झाली आहे. सत्तापदे आपल्याच घरात ठेवू पाहणार्यांना आता आपल्या घरातील एकाचीच उमेदवारी स्वीकारावी लागेल अथवा काँग्रेस पक्ष सोडून अन्य पक्षात जावे लागेल. हे सूत्र ज्यांना मान्य नसेल त्यांनी पक्ष सोडला तरी हरकत नाही, अशी भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली आहे.
पुणे महापालिकेत महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपद भूषविलेल्यांना महापालिकेची उमेदवारी देऊ नये असा प्रस्ताव काँग्रेस पक्षाचे नेते विठ्ठलराव गाडगीळ यांनी १९९२ साली मांडला होता. त्यावेळी अनेकांनी गाडगीळ यांचे नेतृत्व सोडून, ‘कलमाडी हाऊस’चा आश्रय घेतला होता आणि उमेदवारी मिळविली होती. हा अनुभव पाहाता आपल्याच घरात वेगवेगळी सत्तापदे ठेवणारे आता अन्य पक्षात जाण्याची शक्यता आहे. नजीकच्या काळात काँग्रेस पक्षात यावरून वादळ होईल. मात्र, एकाच कुटुंबात एक तिकीट या सूत्राचे स्वागत तरुण आणि नवोदित इच्छुकांनी या सूत्राचे आणि राहुल गांधी यांचे स्वागत केले आहे. यामुळे पक्षात नवचैतन्य निर्माण होईल.