‘मातोश्रीमध्ये बसलेल्या मर्दानी पोलिसांना फक्त २४ तास सुट्टीवर पाठवावं मग…’- नितेश राणे

मुंबई : शनिवारी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी नाट्यमय घडामोडीनंतर ताब्यात घेतलं. मात्र यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी खार पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले होते. त्यानंतर पोलीस ठाण्यामधून बाहेर पडताना पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केली. तसेच यावेळी सोमय्यांच्या गाडीचा पाठलाग करत चप्पलाही फेकल्या. या हल्ल्यामध्ये सोमय्या किरकोळ जखमी झाले आहेत. गाडीच्या डाव्या बाजूची काच दगडफेकीमध्ये फुटली असून सोमय्यांच्या हनुवटीला किरकोळ जखम झाली आहे. या प्रकारावरून आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांना जाहीर आव्हानच दिलं आहे.

राज्य सरकारच्या दबावाखाली पोलिसांनी मध्यरात्री सगळा राडा होत असताना मूक भूमिका घेतल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच थेट जाहीर आव्हान दिलं आहे.

“जर महाराष्ट्रात पोलीस विभागाच्या संरक्षणात दररोज भाजपाच्या नेत्यांवर उद्धव ठाकरेंच्या गुंडांकडून हल्ले होणार असतील, तर त्याला शौर्य म्हणत नाहीत. मातोश्रीमध्ये बसलेल्या मर्दांनी पोलिसांना फक्त २४ तास सुटीवर पाठवावं. मग हे सगळे हल्ले थांबतील याची आम्ही काळजी घेऊ”, असं आव्हान नितेश राणेंनी दिलं आहे. यासंर्दभातलं ट्वीट देखील नितेश राणेंनी केलं आहे.

Sumitra nalawade: